प्रतिनिधी/ गुहागर
चक्री वादळासह मंगळवारी कोसळलेल्या अवकाळी पावसाचा तालुक्यातील 8 गावांना फटका बसला आहे. एकूण 303 घरांचे व 3 गोठय़ांचे अंशतः झालेले नुकसान 10 लाखापर्यंत पोहचले आहे, तर पाच गावांतील 125 बागायतदारांचे आंबा व काजुचेही 10 लाखाचे नुकसान झाले आहे. अजूनही घरे व बागायतींचे पंचनामे सुरू आहेत. नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मंगळवारी चक्रीवादळासह कोसळलेल्या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडवली. बहुतांशी घरांचे छप्पर उडाले, तर काहींच्या घरावर झाडे कोसळून नुकसान झाले आहे. कोरोनामधील लॉकडाऊनमध्ये आर्थिक गणित कोलमडलेल्या येथील जनतेला या नव्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. चक्रीवादळ हे देवघर, गिमवी, शृंगारतळी, चिखली, मळण, झोंबडी, कौंढर काळसुर, वेळंब या गावात झाल्याने घरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या आठ गावांपैकी पाच गावांतील बागायतदारांचे नुकसान झाले असून सर्वाधिक फटका कौंढर काळसुर व वेळंब गावाला बसला आहे. या पाच गावांतील 50 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील बागायतीचे नुकसान झाले आहे. बुधवारपासून येथील गावातील घरांचे येथील तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत पंचनामे सुरू आहेत. वेळंब-नालेवाडी येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याठिकाणी पंचानामे सुरू आहेत. तालुका कृषी विभागाचे कृषी सेवक व कृषी सहाय्यक बागायतदारांच्या नुकसानीचा पंचनामा करत आहेत.
या वादळामध्ये शृंगारतळी येथील 5 घरांचे 26 हजार 610 रूपये, चिखली येथील 6 घरांचे 22 हजार 580 रूपये, मळण येथील 117 घरांचे 3 लाख 50 हजार 53 रूपये, झोंबडी येथील 11 घरांचे 84 हजार 475 रूपये, कौंढर काळसुर येथील 24 घरांचे 51 हजार 450 रूपये, गिमवी येथील 18 घरे व 3 गोठय़ांचे 2 लाख 15 हजार 600 रूपये, देवघर येथील 14 घरांचे 80 हजार 850 रूपये, वेळंब येथील 111 घरांचे 1 लाख 51 हजार 200 रूपये नुकसान झाले आहे. अजून वेळंब नालेवाडीतील नुकसानीचा पंचनामा सुरू आहे. यामुळे हे नुकसान 12 लाखापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
बागायतदारांमध्ये वेळंब, कौंढरकाळसूर, गिमवी, देवघर, मळण या गावांना सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यामध्ये 125 बागायतदारांच्या 50 हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 10 लाख रूपये नुकसान झाले आहे. बागायतदारांसाठी कमीत कमी 2 हजार रूपये ते जास्तीत जास्त 18 हजार रूपये हेक्टरी नुकसान भरपाई मिळू शकते, परंतु अंशतः घरांचे झालेले नुकसान महसूल विभागाकडून मिळेल का, असा सवाल आपद्ग्रस्त करत आहेत.









