आदर्शाची ऐसी की तैसी, राजा महालात; प्रजा झोपडीत
प्रतिनिधी/ गुहागर
राजकारणातील पहिली पायरी आहे मित्रमंडळी, त्यानंतर समाज व एकदा समाजाने स्विकारले की मग सत्ता व ताकदीची आवश्यकता लागते. सत्तेच्या ताकदीमध्ये समाजाचे कवच कमकुवत वाटू लागते. असाच काहीसा प्रकार सध्या गुहागर शहरात सुरू आहे. पक्षाच्या ताकदीला आव्हान देत समाज ताकद उभी केली, परंतु समान संधी व समान न्याय देताना आता ती कमकुवत वाटत आहे. यामुळे यातून हंगामी राजकारण उभे रहात आहे, परंतु या राजकारणात समाज वेठीस धरला जात असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
समाजाची ताकद काय असते आणि एकदा समाज संघटीत झाला की त्यापुढे मोठे राजकीय पक्षही नांगी टाकतात. याचा आदर्श गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत गेल्या अडीच वर्षापूर्वी पहावयास मिळाला. या समाजाला राजकीय पाठबळ मिळाले ते ही मंडळी आपल्याकडे खेचण्यासाठी, परंतु या समाज मंडळाने सध्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांची दांडी गुल केलेली पहावयास मिळत आहे. गेली अडीच वर्षे शहरातील ‘आदर्श’ तालुक्यात व गुहागर मतदार संघात एखाद्या पोवाडय़ाप्रमाणे गुंजत होता, परंतु त्याच आदर्शला आज ग्रहण लागले आहे. समाजाने राजकीय ताकद घ्यावी, परंतु त्याच्या सुरूवातीलाच स्पष्टीकरण होणे आवश्यक असते. यामुळेच शहरातील सामाजिक राजकारण यापुढे पुन्हा डोके वर काढणार नाही अशी अवस्था सध्या नियोजनशून्य प्रमुख मंडळींनी करून ठेवले आहे. समाजाच्या ताकदीचा हंगामी वापर सध्या राजकारणात कसा केला जातो, याचे जिवंत उदाहरण नगरपंचायत, लोकसभा व विधानसभा या सर्वच निवडणुकीत पहावयास मिळाले. गुहागरच्या नगरपंचायत निवडणुकीत केवळ व्यक्तिगत वितुष्ट आणि यातून समाजाच्या ताकदीची आठवण झाली. काही मोजक्या मंडळींना तयार करून अनेक बैठका झाल्या. सामाजिक गठबंधने अधिक मजबूत झाली. याचा लाभ घेण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेतेमंडळीनीही आपल्या उमेदवाराला पराभूत करून या
समाज ताकदीला सहकार्य केले. पुढील काळात हीच समाज ताकद आपल्याला मिळेल अशी आशा पल्लवीत झाली, परंतु एकदा यश आले की आपण इतरांपेक्षाही कसे बलवान आहोत असेच तो सांगत सुटतो. आपल्याला उभे करण्यासाठी झटलेल्या हजारो हातांचा त्याला विसर पडतो. यामुळे पुढील काळात हंगामी राजकारण सुरू झाले. या समाज ताकदीने विधानपरिषदेत जिकडे वजन तिकडे मत असेच रंग उधळले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतही समाजाची सद्भावना जागृत केली.
विधानसभा निवडणुकेत पक्ष बदलला. आपल्या पूर्वीच्या आवडत्या पक्षात आपल्याच समाजाचे नेतृत्व सहदेव बेटकरांच्या रूपाने पुढे आले. बेटकरांनी केवळ समाजाची ताकद मिळेल याच्या आत्मविश्वासावर आपला राजकीय आदर्श सोडून समाजाची कास धरली, परंतु याठिकाणीही भ्रमनिराशा झाली. तेच बेटकर आता समाजहीत सोडाच, राजकारणातही सक्रिय झालेले पहावयास मिळत नाहीत. यामुळे त्यांनी केवळ हंगामी राजकारणात समाज वेठीस धरला का, असे म्हणणे वावगे ठरणारे नाही.
पुढील निवडणुकीत येथूनही तिकीट मिळाले नाही तर पुन्हा पक्ष बदला. त्याठिकाणीही समाजाला हाक द्या अशीच कुटील रणनीती सध्या समाजकारणात राबवली जात आहे. गुहागर शहरातही तसेच सुरू आहे. समाजाला ताकद मिळाली पाहिजे. निवडणुकीपुर्वी हाच समाज बलवान, मात्र निवडणूक संपली की याच समाजाला पक्षाच्या टॉनिकची आवश्यकता लागते. यामुळे समाज संघटन केवळ मदारीच्या खेळाप्रमाणे सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. निवडणुकीत आदर्श बदलतात. त्यांच्या प्रतिमा काढल्या जातात. मात्र दुसरे आदर्श निर्माण करताना मागील आदर्शाचा पाढा वाचून नव्या प्रतिमा भिंतींवर टांगल्या जातात. यातून आदर्शाची एwसी की तैसी झालेली पहावयास मिळते.
राजा महालात, प्रजा झोपडीत समाजाच्या ताकदीवर नेतृत्व उभे राहते. समाजात एक राजा बनतो, परंतु निवडून आल्यावर त्याला महालाची गरज भासते. आपल्या प्रजेलाही याच महालात आणण्यासाठी त्याच्याजवळ पुन्हा चर्चा करावी का याचे भानही रहात नाही. मी चाललो आता तुमच्याजवळ बोलण्यास मला वेळ नाही, अशीच परिस्थिती सध्या गुहागर शहरात पहावयास मिळत आहे.









