हरीत लवादाच्या आदेशानुसार तोडकाम सुरू
प्रतिनिधी/ गुहागर
पर्यटकांना गुहागरच्या अथांग समुद्राचे दर्शन व्हावे आणि सूर्यास्ताचे मनमोहक दृष्य टिपता यावे यासाठी आठ वर्षांपूर्वी गुहागर समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या तीन सीव्ह्यू गॅलरीवर अखेर ‘हातोडा’ पडला आहे. सीआझेडचा भंग करत बांधलेल्या या गॅलरी हरीत लवादाच्या आदेशानुसार शनिवारी जमिनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. यापुढे फ्लोटींग जेटीवर कार्यवाही होणार असून सीआरझेडमधील हॉटेल व रिसॉर्टवरही कारवाई होणार असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांनी दिली.
गुहागर समुद्रकिनाऱयावरील समुद्रदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या तीन सीव्ह्यू गॅलरी 12व्या वित्त आयोगातून सागरी किनारा व सृष्टी पर्यटन विकास अंतर्गत तब्बल 25 लाख रूपये खर्च करून 2012-13 मध्ये उभारण्यात आल्या होत्या. गुहागरच्या पर्यटन विकासासाठी तत्कालीन नगर विकास मंत्री व विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या संकल्पनेतून पर्यटन विकासाच्या नव्या पर्वाची सुरूवात झाली होती. शहरातीलच बळवंत परचुरे यांनी गुहागर समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या फ्लोटींग जेटी, सीव्ह्यू गॅलरी सीआरझेडची परवानगी न घेता उभारण्यात आल्या असल्याने त्या काढून टाकाव्यात अशी मागणी करणारा दावा पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे केला होता. हरित लवादाने 20 जुलै रोजी परचुरे यांच्या बाजुने निकाल देत सीव्ह्यू गॅलरी काढून टाकण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाप्रमाणे शनिवारी उपविभागीय अधिकारी प्रविण पवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अजय चव्हाण, वनपाल संतोष परशेटे, पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या उपस्थितीत गुहागर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता महेश नितसुरे यांनी पोकलेनच्या सहाय्याने या सीव्ह्यू गॅलरीचे बांधकाम तोडण्यास सुरूवात केली आहे. हे बांधकाम तोडण्यासाठी तीन दिवसांचा, तर सर्व साहित्य उचलण्यासाठी आणखी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.
सीआरझेडमधील हॉटेल, रिसॉर्टवरही होणार कारवाई
हरित लवादाकडून आलेल्या निकालाप्रमाणे सीव्ह्यू गॅलरी तोडण्याची कारवाई सुरू झाली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली. हरित लवादाकडे एकूण तीन विषय होते. यापैकी पहिल्या निकालाप्रमाणे ही कारवाई सुरू आहे, तर दुसऱया निकालामध्ये समुद्रावरील फ्लोटींग जेटी काढून टाकण्याचे आदेश झाले आहेत. पतन विभागाकडून याबाबत कार्यवाही सुरू होईल. पावसाळय़ाचे दिवस सोडून पुढील कार्यवाही होईल. तिसऱया दाव्यामध्ये सीआरझेड 3 मध्ये असलेल्या हॉटेल व रिसॉर्टनेही सीआरझेड परवानगी घेतली आहे का ते पाहिले जाणार आहे.
आज नगरपंचायत सीआरझेड 2 मध्ये येत असली तरी याबाबतचे अजूनही स्पष्ट आदेश नाहीत. यामुळे आज जो कायदा आहे त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. नगरपंचायत त्यांना असलेल्या अधिकाराप्रमाणे कार्यवाही करेल, तर महसूल विभागाकडूनही कार्यवाही सुरू असून ज्यांची परवानगी नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई सुरू केली जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
गुहागरवासीयांची अत्यल्प उपस्थिती
गुहागरच्या पर्यटन विकासाकरिता उभारण्यात आलेल्या या सीव्ह्यू गॅलरी तोडताना शहरवासीयांची मोठय़ाप्रमाणात उपस्थिती लाभेल अशी आशा होती, परंतु ठराविक सात ते आठ ग्रामस्थ सोडता इतर कोणीही उपस्थिती दर्शवली नाही. यामुळे पर्यटन वाढीबाबतची आत्मियता शहरवासीयांमध्ये दिसून आली.









