प्रतिनिधी/ गुहागर
तालुक्यातील अवैध दारू व्यवसायावर उत्पादन शुल्कसह गुहागर पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत केलेल्या कारवाईमुळे दारू धंदेवाले धास्तावले आहेत. मात्र यातील बडय़ा दारू धंदेवाल्यांना आश्रय का, असा सवाल उपस्थित होत असून काहींनी हजेरी परेड लावून आपले सौख्य त्या-त्या विभागात अधिक घट्ट केल्याचे पहावयास मिळत आहे.
तालुक्यात सुरू केलेल्या या धाडसत्रामुळे शेकडोने गावठी दारू धंदे आजही खुलेआम सुरू असल्याचे सिद्ध होत आहे. तीन दिवसांपूर्वी उत्पादन शुल्क विभागाने बऱयाच कालावधीनंतर नरवणातील एकावर कारवाई करत त्याठिकाणी गावठी दारूबरोबर विदेशी दारूचा लाखोंचा माल जप्त केला होता. त्यानंतर गुहागर पोलिसांनी या धंद्यांना आळा बसवण्यासाठी धाडसत्र सुरू करून वेलदूर, जामसुत, आबलोली, नरवण याठिकाणाहून विक्रीसाठी ठेवलेली गावठी दारू जप्त करून कारवाई केली. परंतु या धाडसत्रामध्ये नाममात्र कारवाई होते की काय, असा सवाल उठत आहे, गावठी दारू तयार करण्याच्या ठिकाणाला आजही हात का घातला जात नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
चिपळूणमधून टेम्पो भरून दारू आणणाऱया, तर काहीठिकाणी खुलेआम भट्टी लावणाऱया मोठय़ा दारू माफियांना मात्र अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे. वेळणेश्वरमध्ये असाच दारू माफिया आजही कार्यरत आहे. त्याने पुरवलेल्या आजूबाजूच्या गावांतील छोटे गावठी दारू धंदेवाले आज पोलिसांच्या जाळय़ात अडकत आहेत. यामुळे ज्याठिकाणाहून याचा उगम आहे अशा ठिकाणावर पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली तर खऱयाअर्थाने या अवैध धंद्यांवर आळा बसेल, असे मत सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.
पोलिसांच्या धाडसत्रामुळे काहींनी धास्ती घेऊन त्या-त्या बीटच्या अधिकाऱयांजवळ हजेरी परेड सुरू केली आहे. या हजेरी परेडमध्ये एखाद्या बडय़ा उद्योजकाप्रमाणे काहींना हाताशी धरून स्वत:ला अभय मिळवायचा प्रयत्न होत आहे. गावठी दारू विक्रीबरोबर विदेशी दारू विक्रीचा अवैध व्यवसाय अनेकठिकाणी सुरू आहे. यावर पोलिसांनी कारवाई करावी, असा नियम नाही. उत्पादन शुल्क विभागानेही याला आळा घालणे आवश्यक आहे. मध्यवर्ती बाजारपेठेत ज्या तीनठिकाणी दारू विक्री धंदे होते त्याठिकाणी आणखी दोन वाढले आहेत. यामुळे जसजशी कारवाई होते तसतशी एखादा परवाना मिळाल्याप्रमाणे आणखी दारू अड्डे तयार होतात. यामुळे संबंधित विभागाने कारवाई करताना तिचे समुळ उच्चाटन करावे, असेही मत व्यक्त केले जात आहे….









