प्रतिनिधी/ गुहागर
गुहागर तालुक्यातील अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिका धारकांची 90512 सदस्य संख्या असून त्यांना एकूण 4525.60 क्विंटल मोफत धान्य वितरणाचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत 26 दुकानातून 1251.80 क्विंटल मोफत धान्य वितरण करण्यात आले आहे.
गुहागर तालुक्यात अंत्योदयचे 3819, तर प्राधान्यचे 18490 शिधापत्रिका धारक कुटुंब आहेत. या कुटुंबांना दर महिन्याला मिळणारे धान्य वितरण करण्यात आले आहे. तालुक्यातील एकूण 63 रास्त धान्य दुकानदारांकडून अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिका धारकांमधील सदस्य मोजणी पूर्ण झाली असून त्यांना 10 एप्रिलपर्यंत धान्य पुरवठा करण्याचे नियोजन आहे. अंत्योदयमध्ये एकूण 12262 सदस्य तर प्राधान्यमध्ये 78250 सदस्यसंख्या आहे. त्यांना प्रत्येकी 5 किलो मोफत तांदुळ वितरण करण्यात येत आहे. याप्रमाणे मंगळवारपर्यंत 1148 शिधापत्रिकाधारकांना 26 रास्त धान्य दुकानाद्वारे 1251.80 क्विंटल मोफत धान्य वितरण करण्यात आले आहे. जिल्हा पातळीवरून धान्य उपलब्ध होईल त्याप्रमाणे धान्य वितरणाचे काम सुरू आहे.
केशरी शिधापत्रिका धारकांची सदस्य संख्या मोजणी सुरू
अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिका धारकांची संख्या वगळता केशरी(एपीएल) शिधापत्रिका धारकांची संख्या 11454 आहे. शासनाकडून या शिधापत्रिकाधारकांची सदस्य संख्या मागवण्यात आली आहे. या कुटुंबांनाही रास्त धान्य दुकानात धान्य मिळणार आहे.
पावतीवर धान्य वितरण
पॉसमशिनद्वारे धान्य वितरण न करता पावती करून रास्त धान्य दुकानातून धान्य वितरण केले जात आहे. परंतु पावती केल्यानंतर दुकानदारालाच आपला अंगठा वापरून पॉसमशिनवर नेंद करावी लागत आहे. तालुक्यातील 63 रास्त दुकानापैकी 17 दुकानाजवळ कोणत्याही नेटची रेंज नाही. यामुळे जिथे रेंज असेल त्याठिकाणी जाऊन पॉसमशिनवर नोंद घालावी लागत आहे. पावतीद्वारा धान्य वितरण प्रक्रिया लॉकडाऊन काळापुरतीच वापरली जाणार आहे.









