प्रतिनिधी/ पणजी
गुळेली येथे होऊ घातलेल्या आयआयटी प्रकल्पासाठी 10 लाख चौ. मी. जमीन केंद्र सरकारच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे आणि या प्रकल्पासाठीची पायाभरणी पुढील 2 महिन्यात करण्यात येईल, असे सांगून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी जमीन सरकारची आहे, त्यामुळे त्याला विरोध करणाऱया काही व्यक्तिंचा हेतू वेगळा आहे, परंतु हा प्रकल्प होणारच आणि कोणतीही शक्ती तो अडवू शकत नाही, असे ते म्हणाले.
दैनिक तरुण भारतशी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, गुळेली येथील जागा केंद्र सरकारच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच तेथे आयआयटी प्रकल्प आणीत आहे. त्याला कोणी विरोध करीत असतील तर ते चुकीचे आहे. कारण ती जमीन आता गोवा सरकारच्या मालकीची राहिलेली नाही. त्या जमिनीवर केंद्र सरकारचा अधिकार आहे. पंतप्रधान कार्यालयापर्यंत कोणीही कितीही पत्रे पाठविली तरी केंद्रीय प्रकल्प हे कधी बंद पडलेले नाहीत. पंतप्रधानांच्या कार्यालयात दरदिवशी हजारो पत्रे येऊन पडलेली असतात हे त्यांनी लक्षात ठेवावे.
उजो बंद करायला वेळ लागत नाही
जे कोणी उजो उजो या नावाने विरोध करतात त्यांचा उजो बंद करायला वेळ लागत नाही. तथापि, आमचा उद्देश केवळ सत्तरीचा पर्यायाने या राज्याचा विकास आहे. या नियोजित आयआयटी प्रकल्पात रु. 3500 कोटींची गुंतवणूक होणार आहे. गुळेली येथील सदर जमीन ही राज्य सरकारची आहे. ती कोणाची खाजगी जमीन नाही. उलटपक्षी त्या आसपास विरोध करणाऱया काही व्यक्तिनी सरकारी जमीन बेकायदेशीरपणे गिळंकृत केलेली आहे. या सर्व जमिनी आपण सरकारला परत मिळवून देणार आहे. त्या अनुषंगाने आपण संबंधित अधिकाऱयांना सर्वेक्षण करायला पाठविले होते आणि सर्वेक्षण जवळपास पूर्ण होत आलेले आहे. अहवाल हाती येताच बेकायदा गिळंकृत केलेल्या जमिनी सरकार परत ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करील, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
वैफल्यग्रस्त युवकांकडूनच टीका
जे काही युवक वैफल्यग्रस्त होऊन आपल्यावर टीका करतात. अकारण प्रतापसिंह राणे यांच्यावर टीका करत आहेत हे त्यांना शोभत नाही. या राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी प्रतापसिंह राणे यांनी दिलेले योगदान सर्वाधिक आहे. कला अकादमी, हणजुणे धरण, राज्यात सर्वत्र रस्ते, गोव्याला घटक राज्याचा दर्जा, कदंब महामंडळ, गोव्यात विविध ठिकाणी औद्योगिक वसाहती, अनेक प्रकल्प, अनेक पूल हे प्रतापसिंह राणे यांनी बांधलेले आहेत. अशा या नेत्यावर टीका करणारी माणसे कृतघ्न आणि वैफल्यग्रस्तच आहेत, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
ग्रामपंचायत, जनतेला विश्वासात घेण्याची गरज नाही
हा प्रकल्प आणण्यापूर्वी आपण गुळेलीवासियांना विश्वासात का घेत नाही? असा सवाल केला असता जमीन राज्य सरकारची व आपण यापूर्वी 2008 मध्ये मंत्री असतानाच या ठिकाणी भव्य प्रकल्प आणण्याचा इरादा होता. परंतु तांत्रिक कारणास्तव ते शक्य झाले नाही. आता जो आयआयटी प्रकल्प येणार आहे ती जमीन सरकारी असल्याने ग्रामपंचायत वा तेथील जनतेला विश्वासात घेण्याची गरज वाटत नाही. गुळेलीवासीय व सत्तरीवासियांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते प्रकल्पाला विरोध करणार नाही. जे विरोध करतात त्यांचे काहीतरी हितसंबंध असावेत किंवा मंत्र्याला ब्लॅकमेलिंग करण्याचा इरादा असू शकतो. आम्ही सत्तरीच्या विकासासाठी फार मोठा त्याग करीत आहोत आणि या नियोजित आयआयटी प्रकल्पामुळे गुळेलीवासियांना उद्या मोठय़ा प्रमाणात रोजगार संधी प्राप्त होतील. शिवाय अनेक छोटेमोठे व्यवसायही वाढतील. या ठिकाणी देशातील नामवंत व अत्यंत हुशार व्यक्ती शिक्षण घेण्यासाठी येतील. त्यांचा उपयोग आपल्या सत्तरीवासियांना व गोव्याला होईल. पुढील दोन महिन्यात या प्रकल्पासाठी पायाभरणीही होईल. त्यामुळे काही नतद्रष्ट माणसे विरोध करतात.
पर्यावरणाचे निमित्त कोणी सांगू नये. कोकण रेल्वे प्रकल्प उभारतेवेळी देखील झाडे तोडावी लागली होती याची याद आरोग्यमंत्र्यांनी करून दिली व प्रकल्प होणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.









