
वार्ताहर /कडोली
दोन टॉप आणि दोन बेसच्या आवाजावर तरुणाई थिरकली. पोलिसांचा सौम्य लाठीचार वगळता लाखो भाविकांच्या उपस्थितीत कडोली येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर देवालयाचा दसरोत्सव गुलाल, भंडाऱयाच्या उधळणीत उत्साहात पार पडला.
कडोली येथील ऐतिहासिक दसरा उत्सवात तरुणांकडून होत असलेली डॉल्बीची मागणी आणि पोलीस खात्याकडून होत असलेला नकार यामुळे उत्सवात अनुचित घटना घडणार की काय? अशी भीती भाविकांतून होत होती पण पोलिसांच्या भूमिकेला तरुणाईने सहकार्याची भूमिका घेऊन आणि आवाजावर नियंत्रण ठेऊन उत्सवाचा पुरेपूर आनंद घेताना तरुणाई जल्लोषात थिरकली आणि भाविकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. गुलाल, भंडाऱयाच्या उधळणीत बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी यात्रा निर्बंधमुक्त झाल्याने तरुणांनी आणि भाविकांनी यात्रेचा पुरेपूर आनंद घेतला. दोन टॉप आणि दोन बेसच्या तालावर बेळगाव परिसरातील सुमारे 20 हजार तरुणाई थिरकताना पाहावयास मिळत होती.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त केला होता. बेळगावचे पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, गुन्हेविभागाच्या महिला पोलीस उपायुक्त स्नेहा, ग्रामीणचे पोलीस एसीपी गिरीश, काकती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आदित्य राज आदी नियंत्रण ठेऊन होते. शिवाय गावात प्रमुख मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविले होते. यावेळी हुल्लडबाजी करणाऱया तरुणांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
तरंगे आणून देवालयात गाऱहाणे
जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिरात पहाटे काकडारती पूजा झाल्यानंतर पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात खेळण्यांची दुकाने थाटली होती. सायंकाळी देवस्थान पंच कमिटी व हक्कदारांनी सवाद्य तरंगे आणून देवालयात गाऱहाणे घातले आणि केळीच्या झाडांची बन्नी पाडल्यानंतर देवालयाच्या पालख्या सोने लुटण्यासाठी गावच्या सीमेवर नेण्यात आल्या. त्याठिकाणी सोने लुटल्यानंतर यात्रेची सांगता झाली.
प्रभुदेव डेंगरावर सोमवारी पालख्या जाणार
श्री कलमेश्वर देवालयाच्या मानाच्या पालख्या सोमवार दि. 10 रोजी श्री प्रभुदेव डोंगरावर जाणार असून त्याठिकाणी विधिवत पूजा अणि महाप्रसादाचे वाटप झाल्यानंतर दसरोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान पंच कमिटीने केले आहे.









