पंतप्रधान मोदींना अश्रू अनावर, अनेकांची प्रशंसापर भाषणे
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद लवकरच राज्यसभेतून निवृत्त होणार असून त्यांचा कार्यकाळ 15 फेब्रुवारीला संपणार आहे. सध्या सुरू असणारे संसदेचे अधिवेशन हे त्यांचे अखेरचे असल्याने मंगळवारी राज्यसभेने त्यांच्या कार्याचा गौरव केला. ते निवृत्त होणार असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अश्रू अनावर झाले होते. त्यांच्यासह अनेक सदस्यांनी आझाद यांच्या गौरवार्थ भाषणे केली.
आझाद हे राज्यासभेतील विरोधी पक्षनेते होते. त्यांनी गेला 20 वर्षांहून अधिक काळ राज्यसभेत काश्मीर आणि इतर राष्ट्रीय मुद्दे उपस्थित केले. अमोघ वक्तृत्व लाभले असल्याने ते नेहमी सर्व मुद्दय़ांची प्रभावी मांडणी करत असत. ते 1990 मध्ये प्रथम राज्यसभा सदस्य बनले. त्यावेळी त्यांची सभागृहात निवड महाराष्ट्रातून झाली होती. मात्र 1996 मध्ये ते जम्मू-काश्मीरमधून निवडून आले. ते नेहरू-गांधी कुटुंबाच्या विश्वासातले म्हणून ओळखले जात. ते 2006 पर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. 2014 मध्ये काश्मीरमध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पराभव झाला. गेल्या वर्षी घटनेचा अनुच्छेद 360 निष्प्रभ करण्यात आल्याने या राज्याची विभानसभा आता अस्तित्वात नाही. त्यामुळे तेथून आझाद पुन्हा राज्यसभेवर सध्यातरी निवडून येऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना निवृत्त व्हावे लागत आहे.
पत्रामुळे विवाद
काँगेसने त्यांना अन्य राज्यांमधून उमेदवारी न दिल्याने त्यांचा कार्यकाळ संपत आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यासह 23 ज्येष्ठ काँगेस नेत्यांनी काँगेस पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून काँगेसच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच पूर्ण वेळ कार्यरत असणाऱया अध्यक्षाची मागणी केली होती. त्यामुळे काँगेसमध्ये अंतर्गत तणाव निर्माण झाला होता. आझाद नंतर गांधी-नेहरू कुटुंबाच्या नजरेतून उतरले होते असेही बोलले जात होते. त्यांना अन्य राज्यांमधून राज्यसभेची उमेदवारी न मिळण्याला हीच नाराजी कारणीभूत होती असे म्हटले जाते.
पुढील नेता कोण
आझाद निवृत्त होणार असल्याने राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदही रिक्त होणार आहे. या पदावर आता कोणाची नियुक्ती होणार हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. हे पद यापुढे काँगेसकडेच राहील की अन्य कोणत्या पक्षाच्या नेत्याची त्यासाठी निवड होईल, याकडे आतापासूनच उत्सुकतेने पाहिले जात आहे.









