हिवाळय़ाचा मोसम सुरू झाला आहे, म्हणजे थंडी ही पडणारच. गुलाबी थंडीची उत्कंठा प्रत्येकालाच असते. थंडीच्या मोसमात आरोग्य सुधारते, सृष्टीतील अनेक चांगल्या गोष्टींना बहर येतो. शरद ऋतूच्या शुभ्रधवल रंगाची अनुभूती घेतलेल्या सृष्टीने व्यक्त केलेला आनंद प्रत्येक जीवनावर दिसून येऊ लागतो. तसा हा थंडीचा काळ म्हणजे आनंद घेण्याचा काळ. कोजागरीच्या शीतल आनंदानंतर कार्तिकाकडे होणारी वाटचाल आणि दीपोत्सवाच्या मंगल पर्वादरम्यान मनाला आल्हाद देणारी थंडी याचा अनुभव प्रत्येक जण वर्षानुवर्षे घेत आला आहे. पण हवामान बदलाच्या काळात एकाच हंगामात सर्व ऋतूंचा अनुभव घेण्याचे प्रकार सातत्याने आणि प्रतिवषी घडताना दिसत आहेत. थंडीच्या हंगामात पहाटेच्या आणि सायंकाळच्या थंडीचा मुक्त अनुभव घ्यावा, कोवळय़ा सूर्यकिरणांच्या साथीने शरीराला आवश्यक तेवढी नैसर्गिक ऊर्जा मिळवावी, मनसोक्त हिंडावे-फिरावे, सृष्टीच्या बदलाचा आनंद घ्यावा, थंडीमुळे भरून येणाऱया सृष्टीतील बेसुमार पिकणाऱया फळे-भाजीपाल्यांचा मुक्त आस्वाद घ्यावा आणि आपले जीवन आरोग्यपूर्ण, सुंदर बनवावे. थंडीच्या मोसमातील हा मानवाचा पिढय़ा न् पिढय़ाचा जीवनक्रम, अलीकडच्या काळात गतीने बदलू लागला आहे. एकाच मोसमात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळय़ाचे दर्शन होताना दिसत आहे. चार महिने पाऊस पडतो हे फक्त पुस्तकातले सांगणे बनले आहे. प्रत्यक्षात बारा महिने उलटले तरी पाऊस थांबायला तयार नाही. कोठे ना कोठे बरसतो आणि आनंदापेक्षा दु:खाचा वर्षाव करून निघून जातो. त्यातून सावरतो न सावरतो तोच थंडीचेही असेच काहीसे सुरू होते. अगदी आताचे पहा, बहुतांशी भागात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. थंडीचा अनुभव घेण्यासाठी बाहेर पडावे म्हटले तर वातावरण बदललेले असते. थंडीच्या दिवसात भल्या सकाळी बाहेर पडावे थोडीशी ऊर्जा मिळवावी आणि आणि त्याच आनंदात परत फिरावे असा विचार करून बाहेर पडणाऱया माणसाला प्रत्यक्षात रस्त्यावर आल्यानंतर उन्हाचे चटके सोसावे लागतात. बोचऱया थंडीचा आनंद घ्यावा असे वाटावे तेव्हा नेमके कडाक्मयाच्या थंडीचा तडाखा सोसायला लागावा असे सध्याचे वातावरण आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहू लागेल आणि आणि एक शीत लहर अनुभवता येईल असा विचार करायचा, त्याचवेळी थंडीच्या लाटेचा अंदाज वर्तवून आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याचे सल्ले दिले जाऊ लागले आहेत. इतकी सध्याची स्थिती बदलली आहे. सृष्टीत होणाऱया बदलाचे स्वागत करत ऋतू बदलाचा आनंद घेण्याचा काळ कुठेतरी विस्मृतीत चालला आहे. ऋतुबदल म्हणजे आयुष्यावर विपरीत परिणाम असे नवेच काहीतरी डोळय़ासमोर येऊ लागले आहे. अशा स्थितीत बदलत्या ऋतूचे स्वागत करायचे की त्याच्यापासून रक्षणाचे धडे घेत चार भिंतीत स्वतःला कोंडून घ्यायचे हा मानवा समोरचा यक्षप्रश्न बनला आहे. ऋतू बदलतो आहे, प्रकृती सांभाळा. त्यासाठी अमुक एखादे उत्पादन खरेदी करा अशा प्रकारच्या जाहिराती जेव्हापासून दूरचित्रवाणीवर दाखवल्या जात आहेत तेव्हापासून लोक त्यांना सहजतेने घेत आले आहेत. मात्र अलीकडे या जाहिरातींकडेही गांभीर्याने पहावे लागते. कारण कधी आपल्याला त्याची गरज लागेल याचा नेम राहिलेला नाही. निसर्गातील बदलानुसार आपले शरीर त्याचा स्वीकार करते आणि त्या बदलाचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरात दिसावा यासाठी जीवनशैलीतील थोडासा बदल आणि त्याला हलकाफुलका व्यायाम आणि आहाराची जोड दिली की त्या मोसमाचे स्वागत करायला लोक सज्ज झालेले आहेत असे पूर्वी दिसायचे. पण अलीकडच्या काळात या स्वागताची जागा प्रतिबंधात्मक उपायांनी घ्यायला सुरुवात केली आहे. अर्थात संपूर्ण मानव जातच अशाप्रकारे सृष्टीतील बदलांना घाबरून जाते असे होत नाही. मात्र फार मोठय़ा संख्येने लोक प्रतिबंधात्मक औषधे उपकरणे यांची माहिती घेताना किंवा खबरदारी म्हणून स्वतःजवळ बाळगताना दिसत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. काळ कितीही बदलला, परिस्थिती कशीही निर्माण झाली तरी आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ न देता ज्यांनी या स्थितीतसुद्धा आपली जीवनशैली उमदी ठेवली त्यांच्यावर या बदलाचे कोणतेही नकारात्मक परिणाम होताना दिसत नाहीत. वाढते वय त्यांच्या उत्साह आणि आनंदावर परिणाम करू शकत नाही. ते या नव्या जीवनालाही त्याच उत्साही आणि आनंदी पद्धतीने सामोरे जातात. पण प्रश्न त्यांचा नसून, स्थितीतील बदलामुळे ज्यांच्या समोर आव्हाने जीवनाची आव्हाने बनून उभी राहत आहेत त्यांचा आहे. बिघडत चाललेल्या हवामानाचा परिणाम शेवटी संपूर्ण सृष्टीवर होणार तर त्यात त्याचा फटका कमकुवत शरीरयष्टीच्या लोकांना आणि निरोगींनाही बसणार आहे. पण तरीही ही परिस्थिती जितकी नियंत्रणात आणणे मानवी प्रयत्नाने शक्मय आहे तितके प्रयत्न होत नाहीत किंवा तोकडे पडतात. त्याचा परिणाम जनजीवनावर होताना दिसतो आहे. कोरोनाच्या संकटाने गेले आठ महिने भारत आणि आणि दहा ते अकरा महिने जग ठप्प आहे. अशा स्थितीत आलेली थंडी सुद्धा चटके देणारी ठरत आहे. त्याचा विचार आता घराघरातून सुरू झाला तरच पुढच्या पिढीचे भले होणार आहे.
Previous Articleआनंदाच्या, उत्साहाच्या सणांची मालिका-दीपावली
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








