19 जणांची सुरक्षितस्थळी रवानगी, आपत्ती व्यवस्थापनासह सुरक्षा दलांची मदतीसाठी धाव
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील बारामुला जिल्हय़ात गुलमर्गजवळील अफरवात शिखरावरुन झालेल्या मोठय़ा हिमस्खलनामध्ये दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनासह स्थानिक पोलीस आणि सुरक्षा दलांच्या मदत पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तेथील 19 परदेशी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले. या बचाव कार्यात स्थानिक पोलिसांची मोठी मदत झाल्याचे बारामुलाच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.
बुधवारी हिमस्खलनामध्ये परदेशातील काही स्कीयर्स अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ बचाव पथकाद्वारे तेथे धाव घेतली. त्यांची सुटका करत असताना दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे मृतदेहही मिळून आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सध्या जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांमध्ये भूस्खलन आणि हिमस्खलनाच्या घटना घडत आहेत. रामबन जिल्हय़ातही भूस्खलन झाल्याने जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 4 फेब्रुवारीपर्यंत हिमवर्षा तसेच भूस्खलनाच्या घटना घडण्याच्या शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत. प्रशासन अधिकारी तसेच महामार्ग अधिकारी, कर्मचारी रस्ते साफ करण्याचा प्रयत्न करत असून लवकरच महामार्ग सुरु होईल, अशी शक्यता आहे. तथापि पाऊस, हिमवर्षा यामुळे अनेक ठिकाणी वातावरण खराब झाले आहे. थंडीचा कडाकाही वाढला असून घाटीतील अनेक जिल्हय़ांमध्ये दिवसाही वातावरण अतिशय थंड बनले आहे. राजौरीमधील अनेक मार्ग सुरु करण्यात यश मिळाले आहे.
दुसरीकडे जम्मूमध्ये मात्र हवामान सध्यातरी नॉर्मल असून दिवसभर उन पडत आहे. त्यामुळे जम्मूत सध्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्याचबरोबर वैष्णोदेवीला जाणाऱया भाविकांनाही मोठय़ा प्रमाणात सुरक्षितता मिळाली आहे. हेलिकॉप्टर, रोप वे सेवाही सुरु करण्यात आली आहे. 26 जानेवारीपासून वैष्णोदेवी मंदिर भाविकांसाठी खुल करण्यात आले आहे. मंगळवारी एका दिवसांत 12 हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तर जानेवारी अखेर 5 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचेही सांगण्यात आले.









