प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात उन्हाचे चटके तीव्र होत असून प्रामुख्याने उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा, रायचूर, बळ्ळारी जिल्हय़ांमधील तापमानाचा पारा चढताच आहे. गुलबर्गा जिल्हय़ात सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. 28 मार्च रोजी येथे 40.6 डिग्री सेल्सिअस तर 29 मार्च रोजी कमाल 41.6 डिग्री सेल्सिअस आणि 31 मार्च रोजी 41 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मार्च महिन्यात याच जिल्हय़ात सर्वाधिक 43 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविले गेले होते. त्याचप्रमाणे रायचूरमध्ये 39.8, विजापूर आणि बिदर जिल्हय़ात 38.9, कोप्पळ 37.5, गदग 37.2, धारवाड 36.4, दावणगेरे जिल्हय़ात 36 डिग्री सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिलच्या मध्यानंतर तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.









