गुलबर्गा/प्रतिनिधी
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात १३ तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ११ जुलैपासून तीन दिवस राज्यातील किनारपट्टीसह दक्षिण कर्नाटक भागातील जिल्हय़ांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर कर्नाटकातील बेळगावसह धारवाड, बागलकोट, विजापूर, बिदर, गुलबर्गा, यादगीर आणि रायचूर या जिल्हय़ांमध्येही जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान खात्याने या जिल्हय़ांत १३ जुलैपर्यंत ‘यलो अलर्ट’ घोषित केला आहे. परंतु गुलबर्गा जिल्हा प्रशासनाने पुढील आठवडाभरासाठी गुलबर्गा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यास नौकांना मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे, असे पालकमंत्री मुरुगेश निरानी यांनी सांगितले.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यास पुराचा प्रभावीपणे निपटारा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. कारवारहून नौका आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. यावेळी खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबविण्याचे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनानला दिले आहेत.
दरम्यान, पुराचा फटका बसल्यास लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल. गुरांसाठी चारा व्यवस्थादेखील केली जाईल. विविध धरणातून पाणी सोडल्याबद्दल जिल्हा अधिकारी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असतील असे म्हंटले आहे.









