रासुका लावण्याची तयारी : जवानांच्या 30 तुकडय़ा राहणार तैनात
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानात रविवारपासून आंदोलन सुरू करण्याच्या गुर्जर समुदायाच्या इशाऱयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आंदोलनाला तोंड देण्यासाठी गृह विभागाकडून गुर्जरबहुल जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांच्या मागणीवर रासुका लागू केला जाऊ शकतो. सद्यस्थितीत गृह विभागाने जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करत स्थितीचा आढावा घेतला आहे.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याद्वारे पकडण्यात आलेल्या निदर्शकांना कमाल एक वर्षापर्यंत तुरुंगात डांबले जाऊ शकते. भरतपूरच्या जिल्हाधिकाऱयांनी मुख्य गृह सचिवांना रासुका लावण्याची मागणी करणारे पत्र ईमेलद्वारे पाठविल्याची माहिती समोर आली आहे.
सुरक्षा दल होणार तैनात
कायदा तसेच सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि निमलष्करी दलाच्या 30 तुकडय़ा तैनात केल्या जाणार आहेत. यात 7 तुकडय़ा बॉर्डर होमगार्डच्या असतील, ज्यांना जैसलमेर, बाडमेर आणि गंगानगरमधून पाचारण करण्यात आले आहे. याचप्रकारे केंद्र सरकारकडून शीघ्र कृती दलाच्या 2 तुकडय़ा आणि सीआरपीएफच्या 8 तुकडय़ा मागविण्यात आल्या आहेत. याचबरोबर आरएसीच्या 8 तुकडय़ा आणि एसटीएफच्या 4 तुकडय़ा गुर्जर आंदोलनाने प्रभावित क्षेत्रांमध्ये तैनात करण्यात येतील. भरतपूर विभागाचे पोलीस महासंचालक आणि पोलीस अधीक्षक डॉ. अमनदीप सिंग कपूर तसेच जिल्हाधिकारी नथमल यांच्या निर्देशानात 8 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 6 जिल्हा उपपोलीसप्रमुख आणि 50 पोलीस निरीक्षकांना या भागामध्ये नियुक्त करण्यात येणार आहे.
विविध ठिकाणी इंटरनेट बंद
गुर्जर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभाग आणि जिल्हा प्रशासनही स्वतःची चोख तयारी ठेवून कुठल्याही स्थितीला सामोरे जाण्याची तयारी करत आहे. गृह सचिव भरतपूर, करौली, दौसा, जयपूर, सवाईमाधोपूर आणि गुर्जर बहुल जिल्हय़ांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडून सातत्याने माहिती घेत आहेत. या सर्वांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर भरतपूर, दौसा, करौली जिल्हय़ांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याचबरोबर जयपूर जिल्हय़ातील 5 तालुक्यांमध्येही इंटरनेट सेवा बंद आहे.
चक्काजाम करणार गुर्जर
आरक्षणाच्या मागणीवरून राजस्थानात 1 नोव्हेंबरपासून पुन्हा गुर्जर आंदोलन प्रस्तावित झाले आहे. गुर्जर समुदायाच्या लोकांनी पीलुकापुरा येथे पोहोचावे, असे आवाहन गुर्जर आरक्षण संघर्ष समितीचे प्रमुख कर्नल किरोडी सिंग बैंसला यांनी केले आहे. तसेच बैंसला यांनी गहलोत सरकारला 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून राज्यभरात आंदोलन करून चक्काजाम करण्याचा इशाराही दिला आहे. याचदरम्यान राज्य सरकारने गुर्जर समुदायाच्या काही मागण्या मान्य केल्याचे वृत्त आहे. परंतु बैंसला यांनी आंदोलनापासून मागे हटणार नसल्याचे म्हटले आहे.









