भगवंत म्हणाले, उद्धवा गुरुसेवेचा महिमा विलक्षण आहे. कारण शिष्याचा सर्व आत्मभाव गुरुचरणीच लागून राहतो. गुरूच्या मूर्तीचीच त्याला सवय झालेली असल्यामुळे ती गुरुमूर्ती तो हृदयाकाशामध्येच स्थापित करतो आणि मग अनेक प्रकारच्या भजनरंगांत रंगतो. सद्गुरूच्या कृपामृतडोहात तरंग होतो आणि अंतर्बाह्य सारे गुरूचेच स्वरूप आहे असे समजून हृदयामध्ये तीच भावना धरतो. आपला खरा धनी जो सद्गुरु, एक निर्विकल्प कल्पतरूच आहे असे मानतो व त्याच्या छायेखाली बसून अन्य काही न मागता गुरुभक्तीचाच वर मागतो. हे गुरुदेवा ! तुझ्या सर्व वृत्तींची सेवा मीच करावी अशी सद्?भक्तीने त्याची प्रार्थना करून म्हणतो, हे कृपानिधे ! हाच वर मला द्यावा. गुरुनाथाने प्रसन्न होऊन वरदहस्त मस्तकी ठेवून तसा वर दिला असता आनंदाने त्याचे मन उसळू लागते व मला वर मिळाला, मी धन्य झालो असे तो म्हणतो. असा वर मिळवून तीच सेवा तो प्रेमाने आदरपूर्वक करू लागतो. गुरुभक्तीचा भावार्थ अत्यंत धन्य होय. गुरुभजनाचे असंख्य प्रकार आहेत. सद्?गुरुची मन, बुद्धि, अंतःकरण इत्यादि दशेंद्रिये असतात, त्यांच्या सर्व हालचाली मीच व्हावे असे तो मनोभावाने इच्छीत असतो. सद्?गुरु जे जे भोग भोगतात, ते खरोखर मीच होईन. सद्?गुरु जेथे उभे राहतील, तेथील त्यांच्या पायांखालची जमीन मीच होईन. सद्गुरु जिकडे जिकडे चालत जातील, त्या मार्गातील माती मीच होईन. त्यांचे पाय धुण्याचे पाणी मीच होईन व चरण धुणारा मीच आणि त्यांच्या पायांचे तीर्थ मीच सेवन करीन. सद्गुरूंच्या चरणांची धूळ मीच होईन. सद्गुरूंचे सिंहासन मीच होईन. सद्गुरूला जे तेल लागते ते सर्वांगाने मीच होईन. मनातली हाव एवढी की, सद्गुरूंच्या सिद्ध असलेल्या पादुका मीच होईन पाहा ! त्यांना दुसऱयाला हातसुद्धा लावू देणार नाही. गुरूचे श्वासोच्छासही मीच होईन. गुरु जो जो सुगंध घेतील, तो सुगंध मीच होईन. गुरु कृपादृष्टीने जिकडे पाहतील, ते ते दृश्य पदार्थ मीच होईन. गुरूंना जे व्याख्यान आवडेल ते श्रवण करण्याकरिता मी गुरूंचे कान होईन. अथवा जे कीर्तन गुरूंना गोड लागेल, ते गाणारा गायक मी होईन. सद्गुरूंच्या मुखातील कथा मीच होईन सद्गुरुंच्या स्नानाचे पाणी मी होईन.
गुरु जे वस्त्र परिधान करतील, ते उत्तम वस्त्र मीच होईन. गुरूचे पाय पुसावयाला जे धूतवस्त्र असते ते मीच होईन. गुरूच्या अंगाला उटी लावतात ते पवित्र चंदन मीच होईन. गुरुच्या पायांवर अर्पण करावयाचे फूलही मीच होईन. सद्गुरु भोजन करतील ते ताट व अन्नही होईन, त्यांतील रसाची गोडी, पक्वान्न, पंक्तीला बसणारा, सर्व मीच होईन. घुसळावयाला घातलेले दही घुसळून त्यातील जे सार निघते, ते लोणी वैराग्यरूप अग्नीवर कढवून जेवणातील मुख्य तूप मीच होईन. स्वैपाकामध्ये स्वादिष्टपणा आणणारे व सर्व प्रकारच्या चवींचे मूळ कारण म्हणजे त्यांच्या भोजनपात्रावरचे मीठ मी होईन आणि ह्याहून काही कमी असेल ते गुरु पूर्ण करतील. गुरु प्राशन करतील ते पाणी मी होईन गुरुला जे पदार्थ गोड लागतील ते मीच होईन. गुरूला जे फळ अर्पण करतात, ते मी तत्काळ होईन. गुरूला अर्पण केल्यामुळे सफळ झालेले जे फळाचे फळपण तेही मीच होईन. फलाशा फोडून तिची खांडे व वासनेच्या शिरा काढलेले पानाचा विडा सद्गुरूंच्या मुखात शिरून येणारी तांबुलाची रुची मी होईन. मी श्रीगुरूवरून आपल्या जीवाभावाचे निंबलोण स्वतः करून टाकीन. त्यांची सर्व इडापिडा मी घेईन. त्या निंबलोणाचे लक्षण माझ्या ठिकाणी असू देत. अशा अनेक कल्पना करून गुरूच्या सेवेची मनाला अत्यंत आवड असल्यामुळे शिष्य नानाप्रकारचे विचार मनात घोळवत असतो. दैवयोगाने तो जरी दूर गेला तरी भक्तिबळाने तो जवळच असतो. गुरुसेवेकरिताच असा जो स्वतः विकला गेला, त्याला सद्विद्याशस्त्रही सहज अवगत होते. तो गुरूच्या जवळ असो अथवा दूर असो, त्याला गुरुभक्तीची अत्यंत आवडच असते. त्याने आपला प्राण गुरूच्या सेवेसाठी आणि भजनासाठी गुरूच्या द्वारावरच ठेवलेला असतो. असा गुरुभक्तीला तत्पर असल्यामुळे, सद्विद्यालक्षणशस्त्र त्याच्या हाती येते त्याचा त्याला संसारवृक्षाचे छेदन करायला उपयोग होतो.
क्रमशः







