आणखी 271 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
प्रतिनिधी / बेळगाव
गुरुवारी दिवसभरात सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षातून कोणाचाही सुटका करण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाला आणखी 271 अहवालांची प्रतीक्षा असून एक-दोन दिवसात हे अहवाल उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी एका पत्रकाद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे. कोणत्याही कोरोनाग्रस्ताची किंवा संशयितांची सिव्हिल हॉस्पिटलमधून सुटका करण्यात आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपलब्ध माहितीनुसार विलगीकरण कक्षात 39 जणांवर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने गुरुवारी सायंकाळी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. संपूर्ण जिल्हय़ात 2427 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. तर 590 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. 708 जणांनी चौदा दिवसांची तर 1090 जणांनी 28 दिवसांचे क्वारंटाईन पूर्ण केले आहे. आतापर्यंत 1126 जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. यापैकी 798 अहवाल निगेटिव्ह तर 43 पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी 271 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती देण्यात आली आहे.









