नुकतीच दत्तजयंती होऊन गेली. अनसूया आणि अत्रि ऋषींच्या आश्रमात श्रीब्रह्माविष्णूमहेशांनी बालस्वरूपात अवतार घेतला ते अत्रिनंदन म्हणजेच दत्त. त्यांनी तेथे जन्म घेऊन कायमस्वरूपी त्या दोघांना दिव्य आशीर्वाद दिला, म्हणून ते दत्त. दत्तात्रेय. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे प्रतीक. ब्रम्हदेवाचे काम नवनिर्मिती करण्याचे, विष्णुचे काम ते सांभाळण्याचे आणि महेश म्हणजे शिवशंकराचे काम जेथे अनिष्ट, अभद्र आहे ते नष्ट करण्याचे होय. असे हे सत् चित् आनंद असणारे परमतत्त्व. चुकलेल्यांना वाट दाखवणारे म्हणून त्यांना दत्तगुरु असेही म्हणतात. गुरुर्बंधुरबंधूनां गुरुर्चक्षुरचक्षुषाम्। गुरु: पिता च माता चे सर्वेषां न्यायवर्तिनाम्।।…..अर्थ:-गुरु हा बंधू नसणाऱयांचा बंधू आहे. डोळे नसणाऱयांचा डोळा आहे. गुरु ही न्यायाने वागणाऱया सर्वांची माता व पिता आहे. संतांनी तर गुरुला प्रत्यक्ष परमेश्वरच मानले. सद्गुरु सांगतात की, तू जीव नाहीस, तर शिव आहेस. चिदानंद रूपं शिवोए हं शिवोएहम्। अशा या गुरुंसमोर शिष्यानेही कसे वागावे यासंबंधी एक श्लोक आहे. कारण गुरु हा शिष्याला घडवतो. त्याच्यातून तो नवीन गुरु घडवित असतो. गुरुणां सन्निधौ ति÷sत् सदैव विनयान्वति:। पादप्रसारणादीनि तत्र नैव समाचरेत्।।…..अर्थ:- गुरुजवळ नेहमी नम्रपणे उभे रहावे. पाय पसरून बसणे इ. गोष्टी तेथे कधीच करू नयेत….म्हणजेच गुरुचा आदर, सन्मान करावा हेच यातून सांगण्याचा हेतू. त्याने एक अक्षर जरी शिकवले, तरी त्याला अभिवादन करावे. देवरूपी बृहस्पती इंद्राच्या दरबारात आल्यावर त्यांना इंद्राने अभिवादन केले नाही म्हणून देवगुरु निघून गेले व पुढे एका युद्धात इंद्राचा पराभव झाला. याउलट दानव राजा बळी गुरु शुक्राचार्यांच्या आज्ञेत राहिला, म्हणून त्याला इंद्रपद मिळाले, तो अजिंक्मय राहिला. गुरुची शुश्रुषा, सेवा हा शिष्याचा धर्म आहे. अर्जुनाने आपल्या सेवेमुळे, आदरामुळे द्रोणाचार्यांना प्रसन्न करून घेतले. म्हणून द्रोणाचार्यांनी त्याला सर्व विद्या दिली. तो त्यांचा लाडका शिष्य बनला. याउलट गुरुची फसवणूक करून विद्या मिळवल्यामुळे कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले आणि त्याचा पराभव झाला ह्या गोष्टी सर्वज्ञात आहेत. काही शिष्य एकलव्यासारखे केवळ गुरुची मूर्ती समोर ठेवूनही विद्या मिळवतात. गुरुकृपा होण्यासाठी नि:स्वार्थ भावनेने गुरुची सेवा केली पाहिजे, तरच त्यांच्या परीक्षेला तुम्ही उतरता आणि हातचे न राखता गुरुही तुम्हाला आपल्याकडील सर्व ज्ञान देतात. शिष्याकडून पराभव पत्करण्यात गुरुलाही आनंद होतो. म्हणूनच इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोडय़ा अजरामर झाल्या. द्रोण-अर्जुन, वसि-राम, सांदिपनी-कृष्ण, चाणक्मय-चंद्रगुप्त इत्यादी. ज्याला गुरु नाही, त्यांचे ज्ञान अपुरे राहते. म्हणूनच ‘तस्मै श्री गुरवे नमः।।’
Previous Articleम्यां बाणातें दिधलें अभय
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








