वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने गुरुच्या स्थानी असलेल्या तीन व्यक्तींना मानवंदना दिली आहे. या तीन व्यक्तींनी आपली क्रिकेट कारकीर्द घडविली. त्यामुळे सचिनने या व्यक्तींची आठवण म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सचिनने सोशल मीडियावर याप्रसंगी व्हिडिओ प्रकाशित करताना आपल्या हातात क्रिकेटची बॅट दाखविली. ज्यावेळी क्रिकेटमधील कोणताही प्रसंग आठवतो त्यावेळी मला तीन व्यक्तींची आठवण आजही येते. आपली क्रिकेट कारकीर्द घडविणाऱया वडील रमेश तेंडुलकर तसेच भाऊ अजित तेंडुलकर आणि प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना मी कधीच विसरू शकत नाही, असे प्रतिपादन सचिनने केले आहे. भाऊ अजितने मला क्रिकेट क्षेत्रात प्रत्येक वेळी मार्गदर्शन केले आहे. त्याच्या बहुमोल सल्ल्यामुळे मला माझी मानसिक स्थिती अधिक भक्कम बनविता आली. सरावावेळी अजितचे मला नेहमीच मार्गदर्शन मिळाले. क्रिकेटमध्ये होणाऱया चुका सुधारण्यासाठी तो वारंवार मला सल्ला देत असे. प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी मला दर्जेदार क्रिकेटपटू बनविण्यासाठी दिलेला सल्ला आणि मार्गदर्शन मोलाचे असल्याचे त्याने म्हटले. क्रिकेट क्षेत्रात पदार्पण करताना माझ्या वडिलांनी दिलेला मौलिक सल्ला आजही माझ्या आयुष्यात मोलाचा असल्याचे सचिनने म्हटले आहे.








