प्रतिनिधी/ सातारा
गुवाहाटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया या स्पर्धेत साताऱयाच्या सुदेष्णा शिवणकर, स्नेहा जाधव, सुदेष्णा शिवणकर, पार्थ साळुंखे, मयुर पवार यांनी आपली कामगिरी केली आहे. त्यामध्ये आता आणखी गुरुकुल स्कूलच्या साईराज काटे याने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावत नाव वाढवले आहे. त्याची हरियाणाच्या खेळाडूंसमवेत अटीतटीची लढत झाली. त्याने कांस्य पदक मिळवताच कोडोलीत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. विशेष म्हणजे त्याचे वडिल गणेश काटे आणि आई अर्चना यांना खूप आनंद झाला. त्यांनी गुरुकुलचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांचे आभार मानले.
गणेश काटे यांचे हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांच्या घरी सैनिकी वारसा आहे. त्यामुळे खेळाबाबत प्रचंड प्रेम. नेमबाजीची आवड गणेश काटे यांना जशी आहे तशीच त्यांचा चिरंजीव साईराज यालाही आहे. नेमबाजीच्या सरावाकरता त्यांनी घरातच रेंज घेतली आहे. साईराजचा दररोज चांगला सराव सुरु असतो. त्याचबरोबर बालेवाडी पुणे येथेही क्रीडा संकुलात तो सराव करतो. सध्या तो गुरुकुल स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दहावीच्या परीक्षेचा अभ्यास असूनही त्याने खेलो इंडिया या स्पर्धेत सहभाग घेतला. त्याकरता संस्थेचे संस्थाप्रमुख राजेंद्र चोरगे यांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे तोही खेळात उतरला. त्याचे वय 15 असल्याने दिलेल्या निवड चाचणीत 21 वर्षाखालील गटात त्यांची राज्याच्या संघात निवड झाली. गुवाहाटी येथील खेलो इंडिया या स्पर्धेकरता जे 8 संघ निवडले गेले. त्यामध्ये हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, मध्यप्रदेश यांचा समावेश होता. झालेल्या सामन्यांमध्ये दोन जोडय़ामध्ये ही स्पर्धा झाली. साईराजसोबत औरंगाबादची हर्षदा निठावे होती. हर्षदा ही औरंगाबादच्या कॉलेजला शिकत असून त्या दोघांची लढत हरियाणाच्या शबनम आणि विकास कुमार यांच्याशी झाली. सुरुवातीला हर्षदा आणि साईराज यांनी आपला आक्रमकपणा दाखवत गुणांची चढाई केली. परंतु अटीतटीच्या सामन्यात शेवटच्या क्षणी दोन गुणांनी साईराज आणि हर्षदाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. साईराज याने कांस्य पदक मिळवल्याने त्याच्या कोडोली या गावात जल्लोष करण्यात आला. त्याच्या गुरुकुल स्कूलमध्येही आनंद व्यक्त करण्यात आला. त्याबद्दल त्याचे वडिल गणेश काटे यांच्याशी संपर्क साधला असता गुरुकुलचे राजेंद्र चोरगे यांच्यामुळे साईराज खेलो इंडियात कामगिरी करु शकला. त्यांचे धन्यवाद, असे त्यांनी सांगितले.









