21 दिवसांची पॅरोल रजा समाप्त ः कडक सुरक्षाव्यवस्था तैनात
रोहतक / वृत्तसंस्था
खून आणि बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेला सिरसा डेराप्रमुख गुरमीत रामरहीम 21 दिवसांची फर्लो (पॅरोल) सुट्टी संपवून सोमवारी सुनारिया कारागृहात परतला. कडक सुरक्षा बंदोबस्तात रामरहीमने दुपारी पावणेबाराच्या सुमारास सुनारिया तुरुंगात प्रवेश केला. डेरा प्रमुखाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर कारागृहाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तसेच आजूबाजूच्या परिसरातही नाकाबंदी केली होती. गुरमीत रामरहीम पॅरोल रजा मंजूर झाल्यानंतर 7 फेब्रुवारीला तुरुंगाबाहेर पडला होता. पंजाब निवडणुकीच्या तोंडावर त्याला ही सूट देण्यात आल्याने यासंबंधी उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. तसेच न्यायालयातही एक याचिका दाखल झाली होती.
फर्लो रजा संपल्यानंतर रामरहीम सोमवारी दुपारी 11 वाजता गुरुग्राममधील डेऱयातून बाहेर पडला. त्यानंतर सुमारे 50 मिनिटांच्या प्रवासानंतर सुनारिया तुरुंगात पोहोचला. यावेळी 10 वाहनांचा ताफा त्यांच्यासोबत राहिला. कारागृह आणि परिसरात सुरक्षेसाठी 100 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. याप्रसंगी एएसपी कृष्णकुमार लोहछाब, डीएसपी सज्जन सिंह घटनास्थळी उपस्थित होते. रामरहीमचा वाहनताफा सुनारिया तुरुंगाच्या दिशेने जात असताना बराचवेळ अन्य वाहनांची वर्दळ रोखण्यात आली होती. तत्पूर्वी सकाळी आठ वाजल्यापासून पोलिसांनी येथे बॅरिकेड्स लावले होते. कारागृहाच्या आजूबाजूच्या मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली होती.
रविवार, 27 फेब्रुवारी हा रामरहीमच्या पॅरोलचा शेवटचा दिवस होता. संध्याकाळी राम रहीमचे कुटुंबीय आणि काही जवळचे लोक एकत्र घरात पार्टी करू शकतात, अशी चर्चा होती. काही वाहनांचा ताफाही याठिकाणी येताना दिसला. मात्र सेलिब्रेशन झाले नसल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे.









