उद्या पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने काश्मीरसंबंधी बैठक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (24 जून 2021) येथे आयोजित पेलेल्या जम्मू-काश्मीरसंबंधी बैठकीला या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक पक्षाच्या युतीने (गुपकार युती) उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा युतीचे अध्यक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी मंगळवारी केली. या युतीत प्रदेशातील सहा पक्षांचा समावेश करण्यात आला आहे.
या बैठकीसाठी गुपकार युतीला तीन दिवसांपूर्वीच आमंत्रित करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींच्या या पुढाकाराला कसा प्रतिसाद द्यावा, यासंबंधाने युतीत मतभेद असल्याची चर्चा होती. तथापि, नंतर बैठकीत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीचे विषय ठरलेले नाहीत. तथापि, जम्मू-काश्मीरच्या सर्व मुद्दय़ांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, असे अब्दुल्ला यांनी स्पष्ट केले. साधारणतः पावणेदोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतील अनुच्छेद 370 काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्याचे विभाजन जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आलेले होते. यापैकी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा कालांतराने देण्यात येईल, असे केंद्र सरकारने त्याचवेळी स्पष्ट केले होते. आता तसा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्यासंबंधात ही बैठक आहे.
निर्णयाला विरोध करणार
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या निर्णयाला गुपकार युतीचा प्रारंभापासूनच विरोध आहे. त्यामुळे 24 जूनच्या बैठकीत हा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात येईल, अशी माहिती पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. आमची भूमिका यासंदर्भात स्पष्ट आहे. ती बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असे अब्दुल्ला यांनीही प्रतिपादन केले. 24 जूनच्या बैठकीत सर्वच मुद्दय़ांवर सांगोपांग चर्चा होणे शक्य आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.
14 नेत्यांना निमंत्रण
या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण या प्रदेशातील 14 नेत्यांना देण्यात आले आहे. भाजप, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, काँगेस इत्यादी पक्षांचे हे नेते आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुढील वाटचालीसंबंधी आणि या प्रदेशाच्या भवितव्यासंबंधी या बैठकीत चर्चा केली जाईल. एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले होते.
भाजपकडून स्वागत
बैठकीत सहभागी होण्याच्या गुपकार युतीच्या निर्णयाचे भाजपकडून स्वागत करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर प्रदेश भाजपचे अध्यक्ष रविंदर रैना यांनी बैठक सकारात्मक होण्याची आशा असल्याचे स्पष्ट केले. देशाच्या हितासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकजुटीने कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
‘गुपकार’ म्हणजे काय ? जम्मू-काश्मीरमधील सहा स्थानिक पक्षांच्या युतीला गुपकार युती म्हणतात. या पक्षांच्या नेत्यांची या प्रदेशाची राजधानी श्रीनगर येथील गुपकार रस्त्यावर आलिशान निवासस्थाने आहेत. त्यामुळे त्यांच्या युतीला गुपकार युती असे संबोधण्यात येते.









