प्रतिनिधी / कोल्हापूर
चंदगड येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार डॉ. प्रकाश बांदिवडेकर याला खंडणीच्या गुह्यात अटक केली. त्याला शनिवारी दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तो गेल्या अनेक दिवसापासून पसार होता. त्याचा मोबाईल लोकेशनवरुन शोध घेवून त्याच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले, अशी माहिती गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण म्हणाले, पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एका क्रशर व्यावसायिक महिला साधना सागर पाटील (रा. धारवाड, कर्नाटक राज्य) हिच्याकडे संशयीत आरोपी डॉ. प्रकाश बांदिवडेकर आणि शंकर पाटील (पाडळी खुर्द, ता. करवीर) या दोघांनी संगनमत करुन, तुम्ही मला न विचारता जमीन का घेतली. तुम्हाला या जमिनीत उत्खनन करायचे असेल, तर आम्हाला महिन्याला 50 हजारांची खंडणी द्यावी लागेल. अन्यथा आमच्याशी गाठ आहे. तुम्हाला जीवंत सोडणार नसल्याबाबतची धमकी दिल्याविषयी गुन्हा दाखल झाला होता. या गुह्यात संशयीत आरोपी पाटील याचा शोध घेवून त्याला त्वरीत अटक केली. पण दुसरा संशयीत आरोपी डॉ. प्रकाश बांदिवडेकर हा मात्र पसार झाला होता. त्यामुळे पोलिसांनी सायबर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीने त्याचा मोबाईल लोकेशन वरुन शोध सुरु केला. त्यावेळी त्याचे मोबाईल लोकेशन इंदोर (मध्यप्रदेश) दाखवू लागले. त्यावरुन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे एक पथक त्वरीत इंदोरला रवाना झाले. या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा त्याचा शोध घेवून इंदोरमध्ये अटक केली.









