वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट क्षेत्रामध्ये अधिक गुणवत्ता असलेल्या युवा महिला क्रिकेटपटूंचा शोध घेण्यावर निवड समितीचे लक्ष राहील, असे प्रतिपादन नुकत्याच नियुक्त झालेली भारतीय महिला क्रिकेट निवड समिती प्रमुख नीतू डेव्हिडने केले आहे. 16 वर्षीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माचे उदाहरण डेव्हिड यांनी यावेळी दिले.
आधुनिक मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धासाठी कोणत्या गोष्टीची जरूरी भासते याची जाणीव नीतू डेव्हिडला चांगलीच आहे. भारताची युवा महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माला तिच्या गुणवत्तेमुळे भारतीय महिला क्रिकेट संघात संधी देण्यात आली होती. शेफालीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पदार्पण होते. गेल्या मार्चमध्ये झालेल्या महिलांच्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. नवोदित शेफालीकडे षटकार मारण्याची क्षमता अफाट असल्याचे जाणवले. आता भारतीय महिला क्रिकेट संघाला शेफाली वर्मासारखे गुणवत्ता असलेल्या युवा महिला क्रिकेटपटूंची आवश्यकता भासत आहे. शेफालीसारख्या अन्य काही गुणवत्ता असलेल्या महिला क्रिकेटपटूंना संधी देण्याचे समिती सदस्यांचे प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन नीतू डेव्हिडने केले आहे.
यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट निवड समिती प्रमुखपदाची धुरा हेमलता कलाकडे होती. आता हेमलताच्या जागी नीतू डेव्हिडची नियुक्ती करण्यात आली आहे. 43 वर्षीय नीतू डेव्हिडने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत कसोटीमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवित विश्वविक्रम केला आहे. नीतू डेव्हिडने 1995 साली जमशेदपूर येथे झालेल्या इंग्लंड विरूद्धच्या कसोटी सामन्यात आपल्या फिरकीच्या जोरावर एका डावात 53 धावात 8 गडी बाद करण्याचा विश्वविक्रम केला होता. नीतू डेव्हिडने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 10 कसोटी सामन्यात 41 बळी मिळविले असून 2008 साली तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. भारतीय महिला संघाला मिथाली राज आणि झुलन गोस्वामी यांच्या सारख्या अनुभवी खेळाडूंची जरूरी असल्याचे डेव्हिडने म्हटले आहे.









