पुणे / ऑनलाईन टीम
सामान्य लोकांना परवडेल अशा दरात पुण्यातील २,८९० घरांसाठी ‘म्हाडा’कडून सोडत जाहीर करण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे उद्घाटन केले.
‘सर्वांसाठी घरं’ हे शासनाचं धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली २,८९० घरांची लॉटरी हे त्या दिशेनं पडलेलं आश्वासक पाऊल आहे. ‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी ‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा, असं आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
ऑनलाईन अर्ज नोंदणी १३ मे, २०२१ रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी लॉटरी काढली जाईल. यामध्ये पुणे जिल्हयात म्हाळूंगे येथे २०९, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे ४३२अशा एकूण ६४१ सदनिकांचा समावेश आहे. या सर्व सदनिका अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत.
या ऑनलाईन कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी मान्यवर उपस्थित होते.








