सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्यांद्वारे नूतन संवत्सरारंभी शुभसंदेश
प्रतिनिधी / पणजी
हिंदू धर्माभिमानी गुढीपाडवा संपूर्ण विश्वभर साजरा करुन नूतन संवत्सरारंभ मोठय़ा उत्साहात साजरा करतात. गुढी हे प्रतिकात्मक स्वरुप. ज्या निसर्गामध्ये आम्ही सर्वजण राहतो त्या निसर्गाकडे पाहिलं तर गुढीपाडव्याचे निमित्त करुन ऋषिमुनी, साधु-संतांनी समस्त मानव समाजाला सिद्धांत सांगितला. ही सृष्टी ईश्वराची आहे. आपण कधीही कृतघ्नपणाने वागू नये. गुढीपाडवा उत्सवातून कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश आपल्याला हा सण देतो आहे. आम्ही सर्वांनी चांगलं कर्तव्य-कर्म करण्याचा प्रयत्न वर्षभर करायला हवा, असा शुभसंदेश सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी (पीठाधीश्वर, श्री दत्त पद्मनाभ पीठ) यांनी दिला.
हिंदू धर्मानुसार आज गुढीपाडव्याला नूतन संवत्सरारंभ होतो आहे. घरोघरी, देवस्थान अशा सर्व ठिकाणी दारोदारी तोरण बांधून, गुढी पूजन, कडुनिंब प्राशन, पंचांग वाचन तसेच श्रवण करुन हा सण साजरा केला जातो. विश्वभर कोरोना वायरस या विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाद्वारे महत्त्वपूर्ण सूचना केल्या जात आहे. त्यामुळे सर्वांच्या क्षेमकुशलतेचा विचार करुन सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करा. हे संवत्सर आपल्याला सुखदायी, समृद्धदायी व भरभराटीचे जावो, नूतन संवत्सरारंभी श्री दत्त पद्मनाभ पीठाचे अनंत आशीर्वाद असल्याचे ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजीनी म्हटले आहे.









