34-27 गुणांनी विजय, अर्जुन देशवालचे प्रयत्न वाया, बंगाल वॉरियर्स विजयी, तेलुगू टायटन्स-तामिळ थलैवाज रोमांचक लढत ‘टाय’
वृत्तसंस्था /बेंगळूर
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या मोसमातील गुरुवारच्या पहिल्या रोमांचक सामन्यात गुजरात जायंट्सने जयपूर पिंक पँथर्सचा 34-27 गुणांनी पराभव करून विजयी सलामी दिली. गुजरातच्या विजयात त्यांच्या बचावफळीचे योगदान मोलाचे ठरले.
या सामन्यात जयपूर पिंक पँथर्ससाठी अर्जुन देशवालने (10 गुण) रेडिंगमध्ये आणि संदीप धुळने (3 गुण) डिफेन्समध्ये जबरदस्त प्रदर्शन केले. गुजरात जायंट्ससाठी राकेश नरवाल (7) व राकेश (6) यांनी रेडिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर गिरीश मारुती एर्नाक (7) व परवेश भैंसवाल (4) यांनी डिफेन्समध्ये शानदार प्रदर्शन केले.
पूर्वार्धानंतर गुजरात जायंट्सने 19-17 अशी दोन गुणांची आघाडी मिळविली होती. जयपूर पिंक पँथर्सने सामन्याची चांगली सुरुवात करीत बढत मिळविली होती. पण गुजरातने जोरदार मुसंडी मारत त्यांना गाठले. 11 व्या मिनिटाला त्यांनी जयपूरला पिंक पँथर्सला ऑलआऊटही केले. त्यानंतर जयपूरनेही जोरदार मुसंडी मारत गुजरातला ऑलआऊट करण्यात यश मिळविले. पूर्वार्धात रेडिंगमध्ये अर्जुन देशवालने सर्वाधिक 7 तर डिफेन्समध्ये गिरीश एर्नाकने 4 गुण मिळविले.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी रेडिंगमध्ये एकेक गुण मिळविला आणि जयपूरने लवकरच स्कोअरमध्ये बरोबरी साधली. 29 व्या मिनिटाला जयपूरच्या देशवालने आपले सुपर 10 पूर्ण केले तर गुजरातसाठी अनुभवी डिपेंडर गिरीश एर्नाकनेही 5 गुण घेत आपल्या संघाला फारसे पिछाडीवर पडू दिले नाही.
दोन्ही संघांना मोठी आघाडी घेता आली नाही. या सामन्यात गुजरातच्या डिफेन्सने तर जयपूरच्या रेडर्सनी जादा गुण वसूल केले. गुजरातने 13 तर जयपूरने 7 टॅकल गुण मिळविले. शेवटच्या मिनिटाला गुजरातने जयपूरला ऑलआऊट करीत आपला विजयही निश्चित केला तर जयपूरला फक्त एका गुणावर समाधान मानावे
लागले.
तेलुगू टायटन्स-तामिळ थलैवाज लढत टाय

तत्पूर्वी, तेलुगू टायटन्स व तामिळ थलैवाज यांच्यातील थरारक ठरलेला सामना 40-40 असा टाय झाला. या सामन्यात टायटन्स संघ पिछाडीवर पडला होता. पण जोरदार मुसंडी मारत त्यांनी सामना टाय केला. तामिळ थलैवाजचा स्टार रेडर मनजीतने सुपर 10 (12 रेड पॉईंट्स) गुण मिळविले तर टायटन्ससाठी सिद्धार्थ देसाईने सुपर 10 (11 गुण) गुण मिळवित अप्रतिम कामगिरी केली.
प्रारंभी तेलुगू टायटन्सने प्रभावी खेळ केला. त्यांच्या सिद्धार्थ देसाई व रजनिश यांनी चढाईचे महत्त्वाचे गुण मिळविले तर संदीप कंडोलाने उत्कृष्ट बचाव केल्याने आठव्याच मिनिटाला त्यांनी थलैवाजला ऑलआऊट करीत 7 गुणांची आघाडी घेतली. पण थलैवाजही टायटन्सला आघाडीसह पुढे सोडण्यास तयार नव्हते. भक्कम टॅकलिंग व हुशारीने केलेल्या चढायांमुळे गुणांचे त्यांनी अंतर कमी केले. मध्यंतरास 4 मिनिटे असताना मनजीतने 3 गुणांचा सुपर रेड मिळविल्यानंतर थलैवाजला टायटन्सना ऑलआऊट करण्याची संधी मिळाली. 18 व्या मिनिटाला ही संधी साधत त्यांनी 20-20 अशी बरोबरी साधली आणि मध्यंतराला 23-21 अशी किंचीत आघाडीही घेतली. उत्तरार्धात दोन्ही संघांनी टॅकल्सचा तोडीस तोड खेळ केला. मनजीत व प्रपंजन यांनी उत्तम रेड टाकत सुपर 10 मिळविले. थलैवाजने टायटन्सला दुसऱयांदा ऑलआऊट करून 5 गुणांची आघाडी घेतली. पण नंतर टायटन्सनेही देसाईच्या कामगिरीवर थलैवाजला ऑलआऊट केले. शेवटची दोन मिनिटे असताना थलैवाजने बरोबरी साधण्यात यश मिळविले. मनजीतला यशस्वी टॅकल करीत टायटन्सने हा सामना टाय राखला.
बंगाल वॉरियर्सची विजयी सलामी

बेंगळूर : येथे सुरू झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या आठव्या मोसमात बुधवारी झालेल्या तिसऱया सामन्यात यूपी योद्धाने विजयाची संधी थोडक्यात घालवल्याने विद्यमान विजेत्या बंगाल वॉरियर्सकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याआधी तेलुगू टायटन्स व तामिळ थलैवाज यांच्यातील रोमांचक सामना 40-40 असा टाय झाला तर पहिल्या सामन्यात यू मुम्बाने बेंगळूर बुल्सचा 46-30 असा एकतर्फी पराभव केला होता.
संथ सुरुवात करणाऱया यूपी योद्धाने अखेरच्या टप्प्यात जोरदार लढत दिली. पण त्यांची विजयाची संधी अगदी थोडक्यात हुकल्याने त्यांना बंगाल वॉरियर्सकडून 38-33 अशा केवळ पाच गुणांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. योद्धासाठी त्यांचा स्टार खेळाडू परदीप नरवालने 8 रेड गुण मिळविले तर सुरेंदर गिलने 5 गुण मिळविले. कर्णधार नितेश कुमार व आशू सिंग यांनी प्रत्येकी 3 टॅकल गुण मिळविले. यूपी योद्धाला फक्त 1 गुण मिळाला असून ते सध्या पाचव्या स्थानावर आहेत.
योद्धाने सावध सुरुवात केल्यामुळे बंगाल वॉरियर्सला गुण घेण्याची संधी दिली. पहिल्या आठ मिनिटांतच योद्धाने 12 गुण गमविले. पण नंतर नरवालच्या अप्रतिम रेड्समुळे हळूहळू त्यांनी मुसंडी मारली. अनुभवी नरवालने वॉरियर्सच्या खेळाडूंना चुका करण्यास भाग पाडत योद्धासाठी एकूण 8 गुण मिळविले. दोन्ही संघ दोनदा ऑलआऊट झाले तर पूर्वार्ध 18-18 अशा गुणांवर संपला होता. उत्तरार्धात वॉरियर्सने जोरदार सुरुवात केली. रेडर नबिबक्षने जबरदस्त कामगिरी करताना वॉरियर्सला आवश्यक गुण मिळवून दिले. 23 व्या मिनिटाला करो या मरो अशा पद्धतीने रेड टाकली की परतताना त्याला 4 सुपररेड गुण मिळाले. पुढच्याच मिनिटाला योद्धा संघ ऑलआऊट झाला आणि 26 व्या मिनिटाला ते 29-20 असे पिछाडीवर पडले. नंतर योद्धाने पुन्हा जोरदार मुसंडी मारताना काही यशस्वी रेड्स टाकल्या व परिणामकारक टॅकल्सही केले. पण गुणांची पिछाडी भरून काढण्यात ते कमी पडले आणि रोमांचक ठरलेला हा सामना बंगाल वॉरियर्सने जिंकला. यूपी योद्धाची पुढील लढत शनिवारी पाटणा पायरेट्सशी होणार आहे.
शुक्रवारचे सामने
- गुजरात टायटन्स वि. जयपूर पिंक पँथर्स, वेळ : रात्री 7.30 वा.
- पुणेरी पलटन वि. दबंग दिल्ली वेळ : रात्री 8.30 वा.
- हरियाणा स्टीलर्स वि. पाटणा पायरेट्स वेळ : रात्री 9.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.









