ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरात राज्यात पुढील तीन दिवस 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती देताना राज्य सरकारने सांगितले की, केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार, कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोस मधील अंतर वाढवण्यात आले आहे. आता लसीचा दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यानंतर दिला जाणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या एका अध्यादेशात म्हटले आहे की, या तीन दिवसांमध्ये 18 ते 45 वर्षांच्या त्या लोकांसाठी लसीकरण सुरू असणार आहे, ज्यांनी नोंदणी केली आहे आणि ज्यांना लसीकरणासाठी मेसेज आले आहेत.
तर केंद्र शासनाच्या निर्णयानंतर 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना शुक्रवार, शनिवार आणि रविवारी लस दिली जाणार नाही. यात असे देखील म्हटले आहे की, समुहासाठी 17 मे पासून लसीकरण सुरू होईल.
- आतापर्यंत राज्यात 1.47 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण
ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात आता पर्यंत 1.47 कोटी नागरिकांचे लसीकरण करून झाले आहे. यातील 1.09 कोटी नागरिकांना पहिला डोस तर 37.89 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.









