तौक्ते वादळ शमले, गुजरातमध्ये 45 जणांचा मृत्यू
गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरातच्या सागरतटाला सौराष्ट्रजवळ तौक्ते वादळाने धडक दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी या राज्याला भेट देऊन हेलिकॉप्टरमधून पहाणी केली आहे. त्यांनी तातडीने या राज्याला 1 हजार कोटी रुपयांचे साहाय्य आपत्तीनिवारण निधीतून घोषित केले. या वादळात गुजरातमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 45 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात आतापर्यंत 28 बळी गेले असून आणखी 53 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे कार्य निवारण दलांकडून सुरू आहे.
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सकाळी गुजरातमध्ये येऊन काही परिस्थितीची पाहणी केली. या वादळामुळे सौराष्ट्र भागातील काही जिल्हय़ांमध्ये मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. किमान 3 हजार घरे कोसळली असून रस्तेही निकामी झाले आहेत. 250 गावांचा वीजपुरवठा बंद झाला होता, तो आता सुरू करण्यात आला आहे. तीन ते चार हजार वृक्षही उन्मळले आहेत, अशी माहिती देण्यात आली. अमरेली आणि गीर सोमनाथ जिल्हय़ांमध्ये वादळाने सर्वाधिक हानी झाली आहे.
मृत, जखमींना साहाय्य
प्रत्येक मृतामागे 2 लाख रुपयांचे साहाय्य पंतप्रधान मोदी यांनी घोषित केले. तसेच प्रत्येक जखमीमागे 50 हजार रूपयांचे साहाय्य देण्यात येईल. त्यांनी घोषित केलेल्या साहाय्यधनातून वादळग्रस्त भागांमध्ये घरांची दुरूस्ती व पुनर्बांधणी, रस्त्यांची डागडुजी, वीजपुरवठा सुरळीत करणे आणि जखमींवर उपचार करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहेत, अशीही माहिती देण्यात आली.









