मुख्यमंत्री रुपाणी यांचे मौन : राजकोटमध्ये 111 तर अहमदाबादमध्ये 85 मुलांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
राजस्थानच्या कोटा येथील 110 नवजातांच्या मृत्यूच्या धक्क्यातून देश अद्याप बाहेर पडलेला नसतानाच आता गुजरातमध्ये 196 मुलांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. गुजरातच्या राजकोट येथील जिल्हा रुग्णालयात डिसेंबर महिन्यात 111 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर अहमदाबादमध्ये 85 नवजातांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना याबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी मौन बाळगले आहे.
डिसेंबरमध्ये 455 नवजात आयसीयूत भरती झाले होते, यातील 85 नवजातांचा मृत्यू झाला आहे. राजकोटमध्येही 111 नवजातांच्या मृत्यूची पुष्टी प्राप्त झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने मुलांच्या मृत्यूची बाब मान्य केली असली तरीही वैद्यकीय निष्काळजीपणा झाला नसल्याचे म्हटले आहे.
राजकोटमध्ये नवजातांना विलंबाने रुग्णालयात दाखल केले जात असल्याने त्यांना वाचविणे अवघड ठरत असल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. गुजरातच्या सौराष्ट्र भागातील राजकोटमध्ये चांगल्या उपचारांसाठी लोक येत असतात.
राजस्थानच्या कोटा येथील जेके लोण रुग्णालयात नवजातांच्या मोठय़ा संख्येतील मृत्यूने देशाला हादरविले आहे. मागील एक महिन्यात 110 नवजातांचा या रुग्णालयात मृत्यू झाला आह. कोटा मागोमाग राजस्थानच्या बूंदीतही नवजातांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. बिकानेरच्या पीबीएम रुग्णालयातही एक महिन्यात 162 मुलांचा मृत्यू झाला आहे.
या रुग्णालयांच्या दुर्दशेमुळेच हा भयावह प्रकार घडला आहे. कोटा येथील रुग्णालयात डुक्कर हिंडत असल्याचे राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या पथकालाच दिसून आले होते. रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव होता तसेच अल्प संख्येतील कर्मचाऱयांची समस्याही दिसून आली आहे.









