गांधीनगर / वृत्तसंस्था
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुजरातमधील हरामी नाला क्रीक परिसरातून 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. समुद्रमार्गे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान या 6 घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान बीएसएफने गुजरातच्या कच्छ जिह्याजवळील हरामी नाला खाडीतून 11 पाकिस्तानी मासेमारी बोटी जप्त केल्या. या बोटींमधून आलेल्या पाकिस्तानींनी कारवाईचा सुगावा लागताच पोबारा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अजूनही काही घुसखोर खाडीच्या सीमेजवळ लपले असण्याच्या शक्यतेने व्यापक शोधमोहीम सुरू आहे. संशयितांच्या शोधासाठी ड्रोन कॅमेऱयांचीही मदत घेतली जात आहे.
बीएसएफने गुरुवारी सागरी सीमेवरून पाकिस्तानच्या 11 बोटी जप्त केल्या होत्या. तेव्हापासून बोटीतील लोकांचा शोध सुरू होता. कच्छ जिह्याजवळील भारत-पाकिस्तान सागरी सीमेवरील हरामी नाला खाडी परिसरातून बीएसएफने पाकिस्तानी मासेमारी बोटी जप्त केल्या आहेत. गुरुवारी पाकिस्तानी मासेमारी नौका आणि मच्छिमारांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर सुमारे 300 चौरस किलोमीटर पसरलेल्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 11 पाकिस्तानी बोटी जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच अशा आणखी काही बोटी भारतीय हद्दीत घुसल्या आहेत का, याचा शोध घेण्यात येत असल्याचे बीएसएफच्या गुजरात प्रंटियर इन्स्पेक्टर जनरलनी सांगितले.









