नदी-नाल्यांमधून गाड्या-जनावरे गेली वाहून : पूरस्थितीने हाहाकार
वृत्तसंस्था/ जुनागड
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती असतानाच जुनागडमध्ये ढगफुटीची घटना समोर आली आहे. ढगफुटीनंतर सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. शहरातील अनेक भाग पूरमय झाला असून पाण्याचा प्रवाह एवढा जोरात होता की रस्त्यावरून धावणारी वाहने पाण्याच्या जोराने पेंढ्यासारखी वाहत असल्याचे दिसून आले. तसेच पाण्याच्या प्रचंड वेगाने जनावरेही वाहून गेली.
गुजरातमधील जुनागडमध्ये ढगफुटीची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. ढगफुटीमुळे शहर जलमय झाले होते. अवघ्या 4 तासात 8 इंच पावसाने संपूर्ण शहर जलमय झाले. शहरालगत असलेल्या गिरनार या डोंगराळ भागात 14 इंच पाऊस झाला. जुनागड शहरात डोंगराचे पाणी पुराच्या रूपाने घुसल्यानंतर उभी असलेली वाहने वाहून गेली. रस्त्यावर फिरणारी जनावरेही पुराच्या पाण्यात वाहून गेली. तसेच काही लोकही या पुराच्या विळख्यात सापडले. एनडीआरएफचे पथक पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात गुंतले आहे.

ढगफुटीनंतर जुनागड पोलीस अधीक्षकांनी लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आहे. काही तासांच्या पावसाने येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 1983 नंतर प्रथमच येथे इतक्मया पावसाची नोंद झाली आहे. शहरात बांधण्यात आलेल्या बेसमेंट पार्किंगमध्येही पाणी तुंबले आहे. जुनागडमधील भवनाथ भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. दुर्वेशनगर, गणेश नगर, जोशीपारा यासह अनेक भागात रस्त्यांवर 3 ते 4 फूट पाणी तुंबले होते.
भावनगर शहर आणि सौराष्ट्रातील सर्वात मोठे शेत्रुंजी धरण मुसळधार पावसामुळे काठोकाठ भरल्यामुळे धरणाचे 20 दरवाजे एक फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे सखल भागातील 17 गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येथे सुरतजवळील नवसारी जिह्यात चार तासात 6 इंच पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. द्वारकेतही पावसाने कहर केला आहे. हवामान खात्याने भावनगर, नवसारी आणि वलसाडमध्ये अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.









