ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरात मधील राजकोट जिल्ह्यातील शिवानंद कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागात गुरुवारी रात्री आग लागली. या आगीत पाच कोविड रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. तर, काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

शिवानंद कोविड सेंटरमध्ये आग लागली तेव्हा एकूण 33 रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी 11 जणांवर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच राजकोट अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
या आगीत जखमी झालेल्या सर्व रुग्णांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याआधी ऑगस्ट महिन्यात अहमदाबादमध्ये झालेल्या अशाच एका घटनेत खासगी रुग्णालयात आगीत आठ जणांचा मृत्यू झाला होता.









