वृत्तसंस्था/ अहमदाबाद :
लॉकडाऊनचा चौथा टप्पा यशस्वीपणे पार पाडतानाच त्यातून सुखरुपपणे बाहेर पडण्याच्या दृष्टीने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 21 ते 27 मे या दरम्यान ‘कोरोना वॉरियर’ची घोषणा केली आहे. या अभियानामध्ये कथावाचक मोरारी बापू, रमेश भाई ओझा यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहे. या अभियानानुसार राज्यातील सर्व नागरिकांना तीन संकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी घराबाहेर पडू नये, हा या अभियानातील पहिला संकल्प असणार आहे.
दुसरा संकल्प म्हणजे मास्क वापरल्याशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. आणि तिसरा महत्त्वाचा संकल्प म्हणजे सर्व नागरिकांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चा वापर करणे अनिवार्य असल्याचे रुपाणी यांनी सांगितले. ‘कोरोना’शी दोन हात करणे आता गरजेचे असून, हळूहळू सर्वांनीच आपल्या दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. 22 मे रोजी आजी-आजोबांसमवेत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहनही त्यांनी केले. गुजरात राज्यामध्ये कोरोना संक्रमणाची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. बुधवारी कोरोनामुळे 30 लोकांचा मृत्यू झाला असून, 398 नवीन रुग्ण सापडल्याची बाब समोर आली आहे. फक्त अहमदाबादमध्ये 26 लोकांचा मृत्यू झाला असून, नवीन 271 रुग्ण सापडले असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.









