झिम्बाब्वेमधून आलेल्या नागरिकाला संसर्ग – आरोग्य विभागाकडून अधिकृत दुजोरा
जामनगर / वृत्तसंस्था
कर्नाटकनंतर आता गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा अधिकच अलर्ट झाली आहे. सुरुवातीला कर्नाटक आणि आता गुजरातमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचा शिरकाव झाल्याने महाराष्ट्राच्या चिंतेत मात्र भर पडली आहे. झिम्बाब्वेहून परतलेल्या 72 वषीय वृद्धाला ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. त्यामुळे आता देशात ओमिक्रॉनचे तीन रुग्ण झाले आहेत. यापैकी दोन कर्नाटकमध्ये तर एक गुजरातमध्ये असल्याचे शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आदी ठिकाणी संशयित रुग्ण सापडले असले तरी त्यांचा अंतिम वैद्यकीय अहवाल ‘ओमिक्रॉन पॉझिटिव्ह’ असल्याचे निष्पन्न झालेले नाही.
गुजरातमधील जामनगर येथे ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्याचे वृत्त शनिवारी गुजरातच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने ‘पीटीआय’ने दिले आहे. यापूर्वी कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेले 66 वषीय आणि 46 वषीय रुग्ण ओमिक्रॉन व्हेरियंटने संक्रमित आढळून आले आहेत. महाराष्ट्राच्या वेशीवर ओमिक्रॉनचे रुग्ण आढळल्याने राज्यातही खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हाय रिस्क देशांतून 10 ते 30 नोव्हेंबरदरम्यान 3 हजार 136 प्रवासी सध्या देशात आले आहेत. त्यातील 2 हजार 149 प्रवाशांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यांच्यापैकी 10 प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या सर्व प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या या प्रवाशांच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या सगळय़ांचा जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्मयता असून या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे आता सरकार आणि यंत्रणा सतर्क झाली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या दोन रुग्णांची पुष्टी देशात झाल्यानंतर आता सरकार ऍक्शन मोडवर आली आहे. तसेच अन्य राज्येही आता हळूहळू निर्बंध कडक करू लागली आहेत. कर्नाटकात ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. या बैठकीत ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विचारविनिमय करून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
राज्यांकडूनही कडक नियमांची अंमलबजावणी
देशातील राज्यांमध्ये आता नवे नियम पाळण्यात येणार आहेत. दिल्लीमध्ये 30 हजार ऑक्सिजन बेड आणि 10 हजार आयसीयू बेड्ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी देखील केली जात आहे. उत्तर प्रदेशात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन होत आहे. तसेच लक्षणे असणाऱया प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. हाय रिस्क देशांमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. महाराष्ट्रामध्ये दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे या देशांमधून येणाऱया प्रवाशांना 7 दिवस आयसोलेट करण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये 15 डिसेंबरपर्यंत प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत.









