दमण / ऑनलाईन टीम
महाराष्ट्र सरकारला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी यासंदर्भात घोषणा केली. रेमडेसिवीर इंजेक्शनबाबत दमण येथील फार्मा कंपनीत दरेकर आणि लाड दाखल झाले होते.
रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाल्याने दमण येथील फार्मा कंपनीत प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे गेले आणि त्या कंपनीतून ५० हजार रेमडेसिवीरचे डोस भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र सरकारला देणार असल्याचं त्यांनी घोषित केलं. त्यामुळे आता महाराष्ट्राला पुरेशा प्रमाणात इंजेक्शनचा डोस मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि काळाबाजार होत असल्याने केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे केंद्र सरकाने रेमडेसिवीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.
Previous Articleकागल येथे वन्यप्राण्याच्या हल्ल्यात १० मेंढरांचा मृत्यू
Next Article विमान प्रवासादरम्यान जेवण सर्व्ह करण्यास मनाई








