गर्भपात न करता जन्माला देतात पाठिंबा, विवाहपूर्व जन्मलेल्या 7 मुलांना घेतले दत्तक
गुजरातचे ठक्कर दांपत्य गर्भपाताच्या विरोधात नात्यांची नव्या व्याख्या रचत आहेत. पेशाने डॉक्टर असलेल्या यामिनी आणि हितेष हे कुमारी मातांचा गर्भपात न करता त्यांना अपत्याला जन्म देण्यासाठी समर्थन देतात. तसेच जन्मानंतर संबंधित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपनही करत आहेत. संबंधित महिलांच्या जीवनात कुठलीच समस्या उभी राहू नये याचीही ते काळजी घेत आहेत.
ठक्कर दांपत्य कच्छ येथील अंजारमध्ये स्वतःचे रुग्णालय चालवतात. तेथे उपचारच नव्हे तर वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक दुःख हलकं करण्याचेही काम केले जाते. ठक्कर दांपत्य कुमारी माता झालेल्या 7 मुलींच्या अपत्यांना दत्तक घेऊन त्यांचे पालन-पोषण करत आहेत.
विवाहापूर्वीच्या बंधन-मर्यादांवरून समाज आता उदारमतवादी होतोय. पण संबंधांमध्ये मर्यादांचा भंग झाल्यावर गर्भ वाढू लागल्यास मुलगी तसेच तिच्या कुटुंबावर संकटांचा डोंगरच तुटून पडतो. चारित्र्यावर शिंतोडे उडण्याच्या भीतीने गर्भपाताचा मार्ग चोखाळण्यासाठी मुली तयार होतात असे ठक्कर दांपत्याचे सांगणे आहे.
याच हेतूने येणाऱया मुलींना गर्भपात न करण्यासाठी समजावतो आणि गर्भात वाढणाऱया बाळाला जन्म देण्यासाठी प्रोत्साहित करतो. प्रसुतीनंतर मुलगीने नवजाताला न स्वीकारल्यास कुठल्याही किंतू-परंतुशिवाय कायदेशीर स्वरुपात त्याला दत्तक घेतो आणि आमच्या कुवतीनुसार त्याचे संगोपन करत असल्याचे ठक्कर यांनी सांगितले आहे.
असेही घडले
एक मुलगी विवाहानंतर सासरी पोहोचली असता सासऱयाला पुत्रवधूला यापूर्वीच एक अपत्य असल्याचे आणि ते डॉक्टर दांपत्याकडे असल्याचे कळले. सासऱयाने कुटुंबीयांना विश्वासात घेत डॉ. यामिनी आणि हितेष यांच्याशी संपर्क साधला. आम्ही या बाळाला स्वीकारण्यास इच्छुक असल्याचे युवतीच्या सासऱयाने सांगितल्यावर डॉक्टरांनी बाळाला त्यांच्या स्वाधीन केले.









