ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी विजय रुपाणी एका कार्यक्रमात संबोधित करीत असताना स्टेजवर चक्कर येऊन बेशुद्ध पडले होते. यानंतर त्यांना यू एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर आज त्यांचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

मुख्यमंत्री विजय रुपाणी रविवारी प्रचारासाठी वडोदराच्या निजाम पुरा येथे दाखल झाले, परंतु तेथे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते मंचावर पडले. त्याचा बीपी कमी झाला असावा, असा अंदाज लावण्यात आला होता. यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना सरकारी विमानाने अहमदाबाद येथे आणले गेले. त्यांना अहमदाबादमधील यू.एन. मेहता रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिथे त्यांच्या सर्व चाचण्या घेण्यात आल्या.
डॉ. आर. के. पटेल यांनी सोमवारी सांगितले की, विजयभाई यांची काल कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे रिपोर्ट आले असून त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. यासोबतच ईसीजी, इको, सीटी स्कॅन, ऑक्सिजन पातळी सारखे अहवाल सामान्य आहेत. तसेच त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.









