गुगल लहान-मध्यम कंपन्यांना 7.5 कोटी डॉलर्सचा निधी देणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गुगल कोविड-19 च्या अडचणीमधून प्रवास करणाऱया लॅटिन अमेरिका आणि आशियातील लहान व मध्यम कंपन्यांना साडेसात कोटी डॉलर्सचा निधी देणार असल्याची माहिती आहे. अल्फाबेट इंकच्या युनिटसाठी युरोपियन इन्वेस्टमेंट फंड (इआयएफ) यांच्या व्यतिरिक्त दोन्ही महाद्वीपांमधील संघटनांसोबत करार करण्यात आला आहे.
निधी देण्याचे नियोजन कोविड-19च्या विरोधात मागील मार्चपासून सुरु असलेल्या अभियानाचा एक भाग असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. यासह भारतीय कंपन्यांना दीड कोटी डॉलर्स इतका निधी देणार असल्याचे संकेत आहेत.
गुगलने बुधवारी म्हटले आहे, की दोन युरोपीयन इन्वेस्टमेंट फंडमध्ये पैसा घातला जाणार आहे. याच्या मदतीने 1000 लहान युरोपीयन कंपन्यांना दीड कोटी डॉलर्सचा निधी देण्यात येणार आहे. तसेच 200 लाईफ सायन्सेज कंपन्यांना सपोर्ट देणाऱया इआयएफला एक कोटी डॉलर देणार आहे.
भारतीय कंपन्यांना दीड कोटी डॉलर्स
लॅटिन अमेरिकेमध्ये गुगल इंटर अमेरिकन डेव्हलपमेंट बँकेसोबत काम करणार आहे आणि लहान कंपन्यांना 80 लाख डॉलर्सचे कर्ज देणार आहे. त्यांनी आफ्रिका, खाडी देश आणि इंडोनेशियातील कंपन्यांना मदत करण्यासाठी 2.6 कोटी डॉलर्सचा निधी उभारला आहे.









