5 फेब्रुवारीपर्यंत मुदत : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला ऑनलाईनद्वारे माहिती देणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) 2020 च्या शिफारसीनुसार शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात परिणामकारक बदल करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा आणि शैक्षणिक वातावरण निर्माण करणेही आवश्यक आहे. याची माहिती संकलित करण्यासाठी शिक्षण खात्याच्यावतीने मुख्याध्यापक व शिक्षकांकडून गुगल फॉर्मद्वारे माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती ऑनलाईनद्वारे सादर करण्याची अंतिम मुदत 5 फेब्रुवारी आहे.
सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व साहाय्यक शिक्षकांसाठी गुगल फॉर्म 1 व गुगल फॉर्म 2 ची लिंक तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रश्नावली देण्यात आली असून सर्व शिक्षकांनी ती भरून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला ऑनलाईनद्वारे सादर करणे गरजेचे आहे. हा फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी जिल्हा शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अध्यापन आणि बिगर अध्यापन कामासाठी शिक्षकांना द्यावा लागणार वेळ आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम याचाही या सर्वेक्षणाद्वारे अभ्यास करण्यात येणार आहे.
गुगल फॉर्म-1 हा मुख्याध्यापकांसाठी असून यामध्ये आपले राज्य, जिल्हा, तालुका, शाळेचा कोड, गाव/वॉर्ड, शाळेचे नाव, सर्वात कमी इयत्तेचा वर्ग, सर्वात जास्त इयत्तेचा वर्ग, ग्रामीण/शहरी, स्थापना वर्ष, शिक्षकांची संख्या, कायमस्वरुपी/कंत्राटी शिक्षक संख्या, शिक्षकांना इतर कोणकोणत्या कामासाठी वापरले जाते आदी माहिती विचारली आहे.
गुगल फॉर्म-2 शिक्षकांसाठी असून यामध्येही सर्वसाधारण हीच माहिती आहे. या व्यतिरिक्त शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, वर्गवारी, अध्यापनाचा अनुभव-वर्षे, चालू शैक्षणिक वर्षात कामकाज चाललेले दिवस, कोणकोणत्या कामासाठी शिक्षक शाळेवर हजर राहू शकत नाहीत, जसे की रजा, शिक्षणाव्यतिरिक्त निवडणूक, गणती, आरोग्य खात्याचे काम, आपत्ती व्यवस्थापन, प्रशिक्षण, बैठका, पुस्तक वितरण, मध्यान्ह आहार संबंधित काम, पगार पत्रक तयार करणे, इतर पत्रके तयार करणे आदी प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसेच एका विशिष्ट दिवशी प्रत्यक्ष वर्गात शिकविणे, पाठयोजना तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे आदी कामांसाठी किती वेळ देतो, निष्ठा प्रशिक्षण कार्यक्रम, सहपाठय़ उपक्रम राबविणे आदी माहितीही विचारण्यात आली आहे.









