भारतातील कार्यप्रणालीसाठी गुंतवले 400 कोटी रुपये
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन दिग्गज टेक क्षेत्रातील कंपनी गुगलच्या भारतामधील व्यवसायातील कामगिरीच्या मदतीने गुगल इंडियाचा एकूण महसूल आर्थिक वर्ष 2020 मध्ये 34.8 टक्क्यांनी वाढून 5,593.8 कोटी रुपयांच्या घरात पोहोचल्याची नोंद केली आहे. आर्थिक वर्ष 2019मध्ये कंपनीचा एकूण महसूल 4,147 कोटी रुपयांवर राहिला होता, अशी माहिती रजिस्ट्रार ऑफ कंपनीज फायलिंगच्या आधारे मार्केट इंटेलीजेंस फर्म टॉफलरने दिली आहे.
सदरच्या उपलब्ध आकडेवारीतून आर्थिक वर्ष 2020 मध्ये गुगल इंडियाचा निव्वळ नफा हा 586.2 कोटी रुपयांवर राहिला होता. एक वर्षाच्या अगोदर समान कालावधीत 472.8 कोटी रुपयांच्या तुलनेत हा 23.9 टक्क्यांपेक्षा जादा राहिला आहे. 31 मार्च 2020 मध्ये समाप्त झालेल्या आर्थिक वर्षांमध्ये कार्यप्रणालीमधून कंपनीचा महसूल 5384.7 कोटी रुपये राहिल्याची माहिती आहे. एक वर्षाच्या समान कालावधीत हा महसूल आकडा 3992.8 कोटी रुपयांवर राहिला होता.
खर्चामध्ये वाढीची नोंद
आर्थिक वर्ष 2020 मध्ये गुगल इंडियाच्या खर्चात 30.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. सदर कालावधीत एकूण खर्च 4,455.5 कोटी रुपये राहिला आहे. आर्थिक वर्ष 2019 मध्ये कंपनीचा एकूण खर्च हा 3,416.5 कोटी होता.
यावेळी गुगल इंडियाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2019-20 च्या दरम्यान गुगलचा प्री-टॅक्स नफा 1,138.3 कोटी रुपये होता.
आयटी-आयटी आधारीत सेवा
गुगल इंडिया इंटरनेट उद्योगाशी संबंधीत असून यामध्ये आयटी ते आयटी आधारीत सेवा देत असते. यासोबत कंपनी गुगल ऍड-वर्ड्स कार्यक्रमाच्या आधारे जाहिरात क्षेत्रामध्ये तिसरी पार्टी री-सेलच्या पातळीवर कार्य करत असल्याचे स्पष्ट केले आहे.









