वाई पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
प्रतिनिधी / वाई
महागडा मोबाईल विकत घेताना एकाची 65 हजारांची फसवणूक झाली आहे. गुगलपेद्वारे रक्कम स्वीकारणार्या संशयिताने पैसे मिळताच फोन स्वीच ऑफ केला. संशयीताचा फोन बंद असूनही वाई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यपूर्ण तपास करत संशयीतास पुणे येथून अटक केली. किरण गणपती गायकवाड वय 35 रा. उत्तरेश्वरनगर, लोहगाव पुणे मुळ रा. अक्कलकोट रोड सोलापूर असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, दिनांक 24 नोहेंबरला अज्ञात आरोपीताने आय फोन 12 प्रो 128 जीबीचा मोबाईल खरेदीचा व्यवहार फिर्यादी इम्रान शफी सय्यद यांच्याशी ठरवला होता. फिर्यादीस आरोपीने गुगल पे व्दारे पैसे पाठवण्यास सांगितले. त्यामुळे फिर्यादीने त्याच्या भावाच्या बँक ऑफ इंडियाच्या अकाऊन्ट नंबरवरून गुगल पे ला लिंक असलेला मोबाईल नंबर आरोपीस पाठविला. आरोपीने त्याच्या गुगल पे अकाऊन्टवरुन हाय मॅसेज करुन फिर्यादीस 65 हजार पाठवण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे पाठवलेनंतर अज्ञात आरोपी याचा लगेचच संशयिताचा फोन स्विच ऑफ लागला.
यामुळे आयफोन मोबाईल देण्याच्या बहाण्याने आपली 65 हजारांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. यानंतर फिर्यादीने वाई पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. हा गुन्हा मोबाईलव्दारे तांत्रीक पध्दतीने केला असल्याने पो. नि. आनंदराव खोबरे व त्यांचे सह कर्मचारी यांनी या गुन्हयाचा तपास कसून करण्यास सुरुवात केली. गुन्ह्यावेळी आरोपी याने वापरलेला मोबाईल बंद केल्याने तपास करणे अवघड झाले होते. परंतु, आरोपीने फसवणुक कशा प्रकारे केली आहे, याची पूर्ण माहिती काढून त्याचा शोध घेण्याकामी खास पथक तयार करुन आरोपीचा पुणे येथे जावून शोध घेतला. गुन्ह्यात वापरलेला मोबाईल व फसवणूक केलेली रक्कम 65 हजार हस्तगत केली आहे. त्याने अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत काय याबाबतच तपास चालू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. खोबरे, सहा. पो. फौजदार पवार, सहा. पो. फौजदार शिर्के, पो. कॉ. बल्लाळ पो.कॉ.राठोड , पो.कॉ . निंबाळकर यांनी केली.