कोरोनाच्या पाश्वभूमीवर गुगलची खास सुविधा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने वाढत असून, याला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लोक कोरोनाबद्दल आधीच तणावग्रस्त झाले असून, घरी बसून कंटाळले आहेत. अशा परिस्थितीत गुगलने एक खास सुविधा आणली आहे. आता लोक लवकरच गुगल प्ले मुव्हीज ऍपवर टीव्ही शो आणि चित्रपट विनामूल्य पाहणार आहेत. लवकरच एक लायब्रेरी लाइव्ह केली जाईल, असे सांगत गुगलने ही माहिती दिली.
तथापि, या सेवेमध्ये शुल्काच्या जागी जाहिरात सामग्री दाखविल्या जातील. म्हणजेच शो किंवा चित्रपटाच्या दरम्यान जाहिराती दिसतील, हे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून केले जाईल, असे गुगलने म्हटले आहे. वापरकर्ते कोणत्याही अडथळय़ाशिवाय जाहिरातीवर आधारित फ्री-टू-वॉच सेवेचा आनंद घेऊ शकतात. मात्र, या सेवेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला वय सांगणे आवश्यक आहे, कारण कमी वयाच्या मुलांना आर रेटिंग केलेले चित्रपट पाहण्यापासून रोखले जाऊ शकते.
अमेरिकेच्या ‘वुडू’शी साम्य
गुगल प्ले मुव्हीज ऍप अद्यतनित केले जाईल आणि एका श्रेणीमध्ये जोडण्यात येईल. त्यात लोक नवीन चित्रपटही पाहू शकतील. गुगलची ही कल्पना अमेरिकेची स्ट्रीमिंग सर्व्हिस ‘वुडू’शी मिळतीजुळती आहे.









