विविध कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे रिलायन्सचा जिओ प्लॅटफॉर्म मजबूत स्थितीत
नवी दिल्ली : जिओ प्लॅटफॉर्मच्या हिस्सेदारी खरेदीच्या व्यवहारात रक्कमरुपात गुगलने 33,737 कोटी रुपये रिलायन्सला दिले आहेत. या संदर्भात रिलायन्स रेग्युलेटरी फायलिंगकडून माहिती देण्यात आली आहे. रिलायन्सने जुलैमध्ये जिओ प्लॅटफॉर्म्सची 7.73 टक्क्यांची हिस्सेदारी गुगलला विकणार असल्याची घोषणा केली होती.
जिओ प्लॅटफॉर्म्स आणि गुगल यांच्यामध्ये झालेल्या व्यवहाराला कॉम्पीटीशन कमीशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय) मंजुरी मिळाली आहे. रिलायन्सने म्हटले आहे, की या व्यवहाराला मंजुरी मिळालेली आहे. गुगल सबसिडियरी गुगल इंटरनॅशनल एलएलसीला जिओ प्लॅटफॉर्म्सचे 7.73 टक्क्यांचे इक्विटी शेअर ट्रान्सफर केलेले आहेत.
स्वस्त फोन निर्मिती करणार
रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्सची जवळपास 32.96 टक्क्यांची हिस्सेदारी विकून एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान 1,52,096 कोटी रुपयांची रक्कम उभारली आहे. रिलायन्स समूहातील जिओला असेट-लाइट डिजिटल कंपनी बनविण्याचे ध्येय निश्चित केले आहे. सोबत रिलायन्स 5 जी सेवा देण्यास लक्ष केंद्रीत करणार असून रिलायन्स आणि गुगल एकत्रितपणे स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोनची निर्मिती करणार असल्याचे सांगितले आहे.









