शेअर बाजारातील कामगिरीचाही गुंतवणुकीवर परिणाम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
शेअर बाजारांमधील घसरणीसोबत आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये गुंतवणूकदारांना 37.59 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याच दरम्यान मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्सला जवळपास 24 टक्क्मयांची घसरणीचा फटका बसला आहे. प्रमुख तीस कंपन्यांच्या बीएसई सेन्सेक्सला 2019-20 मध्ये 9,204.42 अंकांनी म्हणजे 23.80 टक्क्मयांनी घसरला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 3,026.15 अंकांनी म्हणजे 26.03 टक्क्मयांनी घसरला आहे.
शेअर बाजारात मोठय़ा प्रमाणात विक्री झाल्यामुळे बीएसईमधील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारातील भांडवल आर्थिक वर्षामध्ये 37,59,954.42 कोटी रुपयांनी घटून 1,13,48,756.59 कोटी रुपयांवर स्थिरावला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जागतिक मंदीचे सावट गडद होत असल्याचे दिसून येत आहे. याचा काहीसा परिणाम भारतामधील आर्थिक उलाढालीवर होत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
बाजारात विक्रीचे सर्वाधिक सत्र राहिल्यामुळे 24 मार्चला सेन्सेक्समध्ये मोठी घसरण होत एक वर्षांची नीचांकी पातळी 25,638.9 अंकावर आला आहे. केवळ दोन महिन्यांच्या अगोदर 20 जानेवारीमध्ये 42,273.87 कोटी रुपयाचा उच्चांकी स्तर पार केला होता. 2018-19 मध्ये बीएसईमधील नोंदणीकृत बाजारातील भांडवलात 8,83,714.01 कोटी रुपयांनी वाढून 1,51,08,711.01 कोटी रुपयाच्या घरात पोहोचले होते. तर आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये बाजाराने विविध टप्प्यांचा उच्चांक पार केला आहे. यात बीएसई सेन्सेक्सने ऐतिहासिक 40,000 अंकांचा टप्पा गाठला तर एनएसइ निफ्टी 12,000 चा स्तर पार करण्यात यशस्वी झाला आहे.









