उत्तरप्रदेश प्रशासनाची धडक कारवाई : गँगस्टरच्या शोधाकरता 100 पथकांची नियुक्ती
वृत्तसंस्था / कानपूर
उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये 8 पोलिसांची हत्या करणारा गँगस्टर विकास दुबेच्या किल्लेवजा घराला जमीनदोस्त करण्यात आले आहे. पोलिसांचा मार्ग रोखण्यासाठी गुंडांनी जेसीबी उभा केला होता, याच जेसीबीच्या मदतीने त्याचे घर पाडण्यात आले आहे. प्रशासन आणि पोलिसांची पथके शनिवारी सकाळीच बिकरू गावात पोहोचली. विकासच्या शोधाकरता पोलिसांची 100 पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तर फितुरीच्या संशयावरून चौबेपूर पोलीस स्थानकप्रमुख विनय तिवारीला निलंबित करण्यात आले आहे. एसटीएफकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी चौकशीसाठी 12 जणांना ताब्यात घेतले आहे. गँगस्टर विकास नेपाळमध्ये पलायन करण्याच्या प्रयत्नात असल्याचा संशय पोलिसांना आहे. याच कारणामुळे नेपाळला लागून असलेल्या लखीमपूर खीरी जिल्हय़ातील पोलीस दक्ष आहेत. आत्मसमर्पण करण्यासाठी विकास न्यायालयात अर्ज सादर करणार असल्याचीही चर्चा आहे.
मोबाईल कॉल डिटेलच्या आधारावर संशयितांचा शोध घेतला जात आहे. सुमारे 250 मोबाईल क्रमांक सर्व्हिलान्सवर आहेत. पोलिसांचे पथक चौकशीसाठी बाहेर पडण्यापूर्वी कुणीतरी फोन करून विकासला याची माहिती दिल्याचा संशय आहे. गँगस्टरच्या घरानजीक कुणालाही जाऊ दिले जात नसून गावाबाहेरील लोकांवर बंदी घालण्यात आली आहे. घर पाडण्यापूर्वी पोलिसांनी विकासचे वडिल रामकुमार आणि कामगारांना तेथून बाहेर काढले होते.
चौबेपूर भागातील एका व्यक्तीच्या जमिनीवर गुंड विकासने बळजबरीने कब्जा केला होता. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने न्यायालयात अर्ज केला होता. तक्रारीमुळे संतापलेल्या गुंड विकासने सहकाऱयांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱयाला गुंडाने मारहाण केली होती. हे प्रकरण समोर येताच वरिष्ठ अधिकाऱयांच्या आदेशावर विकास दुबेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांचे पथक अटक करण्यासाठी पोहोचताच विकासच्या गुंडांनी एके-47 रायफलने गोळीबार केला होता. या गोळीबारात 8 पोलीस हुतात्मा झाले होते.









