सातारा जिह्यासह सांगली जिह्यातही फिरण्यास मनाई
प्रतिनिधी / कराड
कराड शहर व परिसरात खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी वसूल करण्यासह सरकारी नोकरांच्या कामात अडथळा आणून जखमी करणाऱया टोळीवर बुधवारी तडीपारीची कारवाई केली. गुंड अभिनंदन रतन झेंडे याच्यासह चौघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीच्या कालावधीत झेंडेसह संशयितांना सातारा जिह्यासह सांगली जिह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्यात फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी ही कारवाई केली.
अभिनंदन रतन झेंडे (वय 39, रा. शनिवार पेठ कराड), प्रतीक उर्फ बबलू परशुराम चव्हाण (वय 25, रैनाक गल्ली, शनिवार पेठ, कराड), परशुराम रमेश करवले (वय 20, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ कराड), अविनाश प्रताप काटे (वय 23, रा. महात्मा फुले चौक, बुधवार पेठ कराड, जि. सातारा) अशी तडीपारीची कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार, गुंड अभिनंदन झेंडेसह इतर साथीदारांवर कराडसह अन्य पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे तडीपारीचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची सुनावणी जिल्हा पोलीस प्रमुखांसमोर सुरू होती. टोळीवरील गंभीर गुह्यांची यादी पाहून बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये तडीपारीची कारवाई केली. झेंडे टोळीला संपूर्ण सातारा जिल्हा व सांगली जिल्हय़ातील कडेगाव, वाळवा, शिराळा तालुक्याच्या हद्दीतून दोन वर्षे हद्दपार केल्याचे आदेश केले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले, टोळीवर गर्दी मारामारी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा हत्यार बाळगणे, खंडणी, जबरी चोरी, सरकारी नोकरांस मारहाण करून गंभीर जखमी करणे असे गुन्हे आहेत. त्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. हद्दपार प्रस्तावाची सुनावणी चालू असलेल्या कालावधीतही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून कराड शहर व सातारा, सांगली जिल्हय़ातील लगतच्या तालुक्यांच्या हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून या टोळीतील चौघांना जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी तडीपार केले.
या कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील, कराड शहर गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार मधुकर गुरव यांनी सहभाग घेतला.









