प्रतिनिधी / धारबांदोडा
दक्षिण गोवा पोलीस विभागातर्फे धारबांदोडा तालुक्यातील कुळे व धारबांदोडा येथे कोरोना जागृती कार्यक्रम करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक सेमी तावारीस, उपनिरीक्षक डायगो ग्रासिएस, सपना गांवस व भक्ती यांनी कोरोनावर गीते सादर केली. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
उपअधीक्षक सेराफीन डायस यांनी कोरोना रोगाबद्दल माहिती दिली. सामाजिक अंतर राखणे महत्त्वाचे असून सर्वांनी सरकारच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोना विषाणूवर मात करणे शक्य आहे, असे ते म्हणाले.
यावेळी दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गांवस, फोंडा पोलीस स्थानकाचे उपअधीक्षक नेल्सन अल्बुकर्क, कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रज्योत फडते आदी उपस्थित होते. कुळे येथे झालेल्या कार्यक्रमात सरपंच मनिष लांबोर यांनी पोलिसांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले. धारबांदोडा येथे पंचसदस्य विनायक गांवस यांनी कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आघाडीवर असलेल्या डॉक्टर्स व पोलिसांचे अभिनंदन केले.









