बंदोबस्तात मतदान : पाकिस्तानातून होतोय विरोध : इम्रान सरकावरवर गैरव्यवहाराचा आरोप
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात विरोक्षी पक्षांच्या तीव्र विरोधानंतरही गिलगिट-बाल्टिस्तानात मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. 18 ऑगस्ट रोजी होणारी निवडणूक यापूर्वी आयोगाने कोरोना महामारीमुळे स्थगित केली होती. याचदरम्यान भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी या कथित निवडणूक प्रक्रियेला पुन्हा विरोध दर्शविला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानची स्थिती बदलण्याचा पाकिस्तानला कुठलाच कायदेशीर आधार नाही. पाकिस्तान सरकारचे हे पाऊल पूर्णपणे अवैध आणि बेजबाबदारपणाचे असल्याचे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
गिलगिट-बाल्टिस्तानच्या 24 विधानसभा मतदारसंघांपैकी 23 ठिकाणी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 330 उमेदवार आहेत. चार महिलाही निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. पीपीपीने 23 तर पीएमएल-एनने 21 उमेदवार उभे केले आहेत. तेथील एकूण 1,141 मतदान केंद्रांपैकी 577 संवेदनशील तर 297 केंद्रांना अतिसंवेदनशील घोषित करण्यात आले आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि बलुचिस्तानचे 15,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत.
विरोधकांकडून चिंता व्यक्त
पाकिस्तानातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीच्या कायदेशीर पैलूंसंबंधी चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर मतांमध्ये फेरफार घडवून आणल्याचा आरोप पीएमएल-एनचे अध्यक्ष तसेच माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केला आहे.
भारताची भूमिका
पाकिस्तानकडून गिलगिट-बाल्टिस्तानला 5 व्या प्रांताचा दर्जा देण्यात आल्याने भारताने तीव्र आक्षेप नोंदविला होता. पाकिस्तानने या भूभागावर अवैध कब्जा केला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखचे संपूर्ण क्षेत्र भारताचा अविभाज्य घटक असून कायम राहतील, यात पाकव्याप्त काश्मीरही सामील असल्याचे भारताने स्पष्ट केले होते.









