प्रतिनिधी /सांगे
गावची मंदिरे ही गावातील लोकांना एकसंध ठेवतात. गावचे प्रश्न येथे सोडविले जातात. गावातील लोक गुण्यागोविंदाने देव म्हटले की, एकत्र येतात. गावाला एकत्र ठेवण्यात मंदिराची भूमिका खूप महत्त्वाची आहे. येथे राजकारणाला थारा मिळता कामा नये. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे, असे सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी कोंगारे-भाटी येथे सांगितले.
कोंगारे-भाटी येथिल श्री सिद्धिविनायक मंदिराजवळ साडेआठ लाख रु. खर्च करून पेव्हर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच उदय नाईक, उपसरपंच आवडू गावकर, साहाय्यक अभियंता दयानंद नाडकर्णी, मळकर्णे सरपंच लिओनारा रॉड्रिग्स, विश्वनाथ नार्वेकर, वेळीप हजर होते. पुढे बोलताना आमदार गावकर म्हणाले की, कोरोना महामारीमुळे हे काम सुरू करण्यास थोडा उशीर झाला. आता लगेच कामाला सुरुवात होऊन काम पूर्ण झाल्यावर मंदिराला शोभा येणार आहे. तसेच सांगे मतदारसंघातील काही मंदिरांचा परिसर सुशोभित करण्याची कामे लवकरच सुरू होणार आहेत, असे ते म्हणाले. सरकारच्या माध्यमातून जी लहान सहान कामे राहिली आहेत, ती देखील चालीस लागणार आहेत, असे गावकर यांनी स्पष्ट केले. सरपंच नाईक यांनी सांगे भागातील मंदिराची सुशोभिकरणाची कामे हाती घेतल्याबद्दल आमदार गावकर यांचे कौतुक केले. अशी कामे लोकांसाठी गरजेची आहेत, असे ते म्हणाले.









