वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील केरी पंचायत क्षेत्रांमध्ये कोरोना रोगाच्या भीतीने चार दिवसांपासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या टाळेबंदीला 99 टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा भागातील नागरिकांनी केला आहे .फक्त एक दुकान सोडल्यास इतर सर्व प्रकारची आस्थापने बँका पूर्णपणे बंद असून नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल याभागातील सरपंच पंच सामाजिक कार्यकर्त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत .गेल्या चार दिवसापासून गोवा बेळगाव दरम्यानची वाहतूक या महामार्गावर होत असलीतरी या वाहनांना याठिकाणी थांबा देण्यात येत नसल्यामुळे याठिकाणी रोगाचा संसर्ग होण्याची भीती कमी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबतची माहिती अशी की केरी पंचायत क्षेत्रात नजीक असलेल्या मोर्ले पंचायत क्षेत्रांमध्ये रोगाचे एकूण आठ पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर केरी भागांमध्ये विशेष काळजी घेण्यात येत आहे . याभागातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने टाळेबंदी करण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर भागातील दुकानदार बँका वेगवेगळय़ा आस्थापनाने चांगल्या प्रकारचे सहकार्य दिल्यामुळे गेल्या चार दिवसापासून 99 टक्के भागातील सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत . मात्र एका वर्तमानपत्रकडून या भागातील दुकानदाराला धमकी देऊन त्यांची दुकाने बंद करण्याचा काही नागरिकांनी प्रयत्न केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर भागांमध्ये तीव्र स्वरूपाची खळबळ निर्माण झाली असून या भागांमध्ये तीव्र स्वरूपाची संतापाची लाट पसरली आहे. याबाबत टाळेबंदी व नित्यनियमाने या भागांमध्ये सामाजिक उत्कर्षासाठी झटणारी काही सामाजिक प्रतिनिधीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेले आहेत..
गोविंद गावस
केरी पंचायतीचे सरपंच गोविंद गावस यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नागरिकांनी केलेल्या आवाहनाला या भागातील दुकानदाराने चांगल्या प्रकारचे सहकार्य दिले आहे. पंचायतीने यासंदर्भात नागरिकांची आरोग्य सुरक्षित राहायचे असेल तर आपण प्रत्येकाने यासंदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर टाळेबंदीला चांगल्या प्रकारचे सहकार्य लाभलेले आहे .कुणावरही आतापर्यंत जबरदस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे जबरदस्तीच्या बातम्या पूर्णपणे खोटारडय़ा असून या गावाची बदनामी करण्यासारखे असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
चंद्रकांत परब.
भागाचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत परब यांनीही गावाची विनाकारण होत असलेली बदनामी यांच्या पार्श्वभूमीवर तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे. आतापर्यंत केरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी याभागातील सामाजिक क्षेत्रात वावरणारे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात स्वतःची पदरमोड करून प्रयत्न करीत असतात .मात्र एका वर्तमानपत्राला हाताशी धरून याभागातील काही समाज कंटक गावाची बदनामी करण्याच्या दृष्टिकोनातून अशाप्रकारचे कारस्थान रचत असल्याचा आरोप केला आहे .त्यांचे हे कुटिल खेळ सफल होणार नसून येणाऱया काळातही गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने व एकदिलाने काम करण्याची शप्पथ घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरफराज सय्यद.
केरी मध्यवर्ती परिसरामध्ये युवा कार्यकर्ते तथा दुकानदार सरफराज यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आमच्यावर कोणीही दबाव घातलेला नसून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केलेले आहे. यामुळे दुकानदारावर दबाव घालून हेतुपुरस्सरपणे टाळेबंदी करण्यात आल्याच्या अफवा ह्या पूर्णपणे सर्वसामान्य जनतेच्या डोळय़ात धूळ फिरणारे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
गणपत गावस.
भागातील सामाजिक कार्यकर्ते तथा दुकानदार गणपत गावंस यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना केरी भागातील नागरिक दुकानदार व वेगवेगळय़ा आस्थापनातील मालकांनी स्वयंस्फूर्तीने केरी गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून टाळेबंदी हाती घेतलेली आहे. गेल्या चार दिवसापासून चांगल्या प्रकारचे सहकार्य याभागातील सर्वांकडून मिळत असल्यामुळे कोणालाही दबाव घालून ही टाळेबंदी करण्याचा काहींचा आरोप पूर्णपणे निरर्थक असल्याचे स्पष्ट केलेले आहे .अशा प्रकारच्या समाजकंटकांच्या दिशाभूल स्वरूपाच्या माहितीवर कोणीही विश्वास ठेवू नये व येणाऱया काळातही केरी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी केलेल्या सहकार्याप्रमाणे भविष्यात अशाच प्रकारचे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.









