मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात रोहित नेट्समध्ये सराव करत असल्याचे माझ्या निदर्शनास आणून देण्यात आले. जर दुखापत गंभीर असती तर तो अगदी पॅड देखील घालू शकला नसता. सध्या आपण नोव्हेंबर अखेरीस सुरु होणाऱया ऑस्ट्रेलिया दौऱयातील वनडे व टी-20 संघाची चर्चा करत आहोत. पण, कसोटी तर दि. 17 डिसेंबरच्या आसपास सुरु होईल आणि त्याला अद्याप दीड-एक महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यात तो मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये सराव करत असेल तर दुखापतीचे स्वरुप नेमके कसे आहे, हे सांगणे कठीण आहे, असे सुनील गावसकर या स्पर्धेचे प्रसारण करणाऱया वाहिनीवर म्हणाले.
माझ्या मते अधिक पारदर्शकता आवश्यक आहे. रोहितबाबत असा निर्णय का घेतला गेला, याची माहिती भारतीय क्रिकेट चाहत्यांना मिळायला हवी, असे गावसकर आग्रहपूर्वक म्हणाले. तसे पाहता, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने हिरवा कंदील दर्शवला तर सुनील जोशी यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती रोहितचा पुन्हा संघात जरुर समावेश करु शकते. पण, सध्या जे घडले, त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्याशिवाय राहिलेल्या नाहीत.









